आठवलेंनी निरोपच्या भाषणात गुलाम नबी आझाद यांना दिलेली ‘ती’ ऑफर ऐकून हसू अनावर


नवी दिल्ली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह राज्यसभेतील चार सदस्यांचा कार्यकाळ संपत असून सभागृहात या सदस्यांना निरोप देण्यात आला. आपल्या भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केल्या. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनीही यामध्ये आपल्या खास शैलीमध्ये गुलाम नबी आझाद यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आठवले यांनी केवळ शुभेच्छा देऊन न थांबता गुलाम नबी आझाद यांनी पुन्हा राज्यसभेवर यावे अशी इच्छाही बोलून दाखवली. तुम्हाला पुन्हा राज्यसभेवर काँग्रेस आणणार नसेल तर आम्ही तयार असल्याची ऑफरही आठवलेंनी दिली.

राज्यसभेचा गुलाम नबी आझाद, मीर मोहम्मद फयाज, शमशेर सिंह मन्हास, नाझीर अहमद या चार सदस्यांचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येणार आहे. आज संसदेमध्ये याच पार्श्वभूमीवर या खासदारांना निरोप देण्यात आला. यावेळी आठवलेंनी, राज्यसभेमध्ये विरोधीपक्ष नेते असणाऱ्या गुलाम नबी आझाद यांना शुभेच्छा देताना तुम्ही सभागृहामध्ये परत यावे असे वाटते. जर तुम्हाला काँग्रेस परत आणणार नसेल तर आम्ही तयार आहोत. तुमची या सदनाला गरज असल्याचे म्हटले. आठवलेंनी दिलेली ऑफर ऐकून गुलाम नबी आझाद यांनाही हसू आले.