रोहित पवारांच्या फेसबुक पोस्टवर राम शिंदेंचा पलटवार


अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अहमदनगरच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माजी मंत्री राम शिंदे यांना धक्का दिल्याची चर्चा होती. पण फेसबुक पोस्ट करत हा मला नव्हे तर रोहित पवारांनाच मोठा धक्का आहे. त्यांचा नैतिकदृष्ट्या पराभव झाला आहे, असा पलटवार राम शिंदे यांनी केला आहे.

पुन्हा एकदा जिल्हा बँकेचे संचालकपद माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे खंदे समर्थक जगन्नाथ राळेभात यांच्या घरात येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यामुळे विखेसमर्थक असलेल्या राळेभात यांचा बिनविरोध संचालकपदाचा मार्ग सोपा झाला आहे. माजी मंत्री राम शिंदे विखे-पवारांच्या ऐनवेळीच्या छुप्या युतीने बॅकफूटला गेल्याची चर्चा होती. शिंदे यांनी रोयाच चर्चांवर फेसबुक पोस्ट लिहित हित पवार यांच्यावर पलटवार केला आहे.

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये राम शिंदे यांनी म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाच्या वतीने अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या सेवा संस्थेच्या मतदारसंघात विद्यमान संचालक जगन्नाथ राळेभात यांना तिकीट दिले होते, तर राष्ट्रवादीने सुरेश भोसले यांना उमेदवारी दिली होती. पण त्यांच्या उमेदवाराला सुचक मिळाला नाही. राळेभात यांचा मुलगा अमोल राळेभात यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या अर्जावर एकच सुचक होता. सुचक ज्यांच्या पक्षाला मिळाला नाही त्या पक्षाची अवस्था काय होती हे यावरून स्पष्ट होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचा अर्ज छाननीत बाद झाला असताना रोहित पवार यांनी राजकीय दबाव आणून, तो मंजूर करून घेतला. त्यामुळे आमच्या उमेदवारावर पडणारा गुलाल काही दिवस लांबला. रोहित पवार यांनी निवडणूक झाली तर दारुण पराभव होईल या भीतीने आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेतला हा त्यांचा नैतिक पराभव असून त्याची आता सुरुवात झाली असल्याचा एल्गार राम शिंदे यांनी केला आहे.

भाजपकडून जामखेड तालुका सोसायटी मतदारसंघातून जगन्नाथ राळेभात आणि त्यांचे पूत्र अमोल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले यांना आमदार पवारांनी निवडणूक रिंगणात उतरविले. भोसलेंच्या उमेदवारीने निवडणुकीतील चुरस वाढली. सुरुवातीला राळेभात पिता-पुत्रांपैकी एकच अर्ज राहून बिनविरोध निवडणूक होईल, असे चित्र निर्माण झाले आहे.

राळेभात यांचे पुत्र ही निवडणूक बिनविरोध व्हावी, याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुधीर राळेभात यांनी आमदार रोहित पवारांशी चर्चा केल्यानंतर आमदार पवारांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश भोसले यांना या निवडणुकीतून माघार घेण्याची सूचना केली. पुढचे नियोजन आमदार रोहित पवारांच्या आदेशानंतर सुरु झाले. त्यानुसार आता राळेभात पिता-पुत्रापैकी एकाचा बँकेत बिनविरोध संचालक म्हणून जाण्याचा मार्ग मोकळा झाला.

सुरेश भोसले यांना रोहित पवार यांनी अर्ज मागे घ्यायला लावून तसेच ऐनवेळी विखेंशी छुपी युती करुन राजकारणाचा ‘नगरी पॅटर्न’ दाखवून दिला आहे. नगर जिल्ह्यातील निवडणुकांसाठी रोहित पवारांचे हे बेरजेचे राजकारण यापुढच्या राजकारणात महत्त्वाचे मानले जात आहे. पण यामुळे माजी मंत्री राम शिंदे यांना चांगलाच धक्का बसल्याची चर्चा आहे.