राणे समर्थक नगरसेवकांनी नितेश राणे यांच्या वागणुकीला कंटाळून केला शिवसेनेत प्रवेश


सिंधुदुर्ग : वैभववाडी नगरपंचायतमधील 7 राणे समर्थक नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश होत असून भाजप आमदार नितेश राणे यांच्या वागणुकीला कंटाळून हे सर्व नेते शिवसेनेत प्रवेश करत असल्याचा टोला विद्यमान शिवसेना नेते आणि पूर्वी नारायण राणे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे सतीश सावंत यांनी लगावला. प्रवेश करत असलेले सर्व 7 माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, आणि नगरसेवक आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितित या सर्वांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे सतीश सावंत म्हणाले.

भाजपचे 7 कार्यकर्ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. नारायण राणे यांना हा फार मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार राजन तेली यांनी या नेत्यांच्या जाण्याने भाजपला कोणताही फरक पडणार नसून वैभववाडी नगरपंचायतीत संपूर्ण 17 जागा भाजपच जिंकेल, असा दावा केला.

आपल्याला आरक्षण जाहीर झाल्यानंतर पुन्हा उमेदवारी मिळणार नसल्यामुळे हे पाऊल या सात नगरसेवकांनी उचलले आहे. भारतीय जनता पक्ष वैभववाडीत मजबूत आहे. भाजप दोन महिन्यानंतर होणाऱ्या निवडणुकीत 17 जागेवर जिंकेल. येथे भारतीय जनता पक्ष मजबूत आहे. अमित शहा आल्यानंतर भाजप आणखी मजबूत झाला आहे. जिथे जिथे अमित शहांचे पाय लागतात तिथे तिथे भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलते हा देशातला इतिहास आहे. भारतीय जनता पक्ष मजबुतीने उद्याच्या निवडणुकांना सामोरे जाईल, असे राजन तेली म्हणाले.