आफ्रिकेमधील या देशात रहस्यमय आजाराचा प्रादुर्भाव, १५ जणांचा रक्ताच्या उलट्या होऊन मृत्यू


दार ए सलाम – जगभरात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असतानाच एक रहस्यमय आजार आफ्रिकेमधील टंझानियामध्ये पसरला आहे. रक्ताच्या उलट्या या अज्ञात आजारामुळे बाधित झालेल्या लोकांना होत आहेत. यादरम्यान, रहस्यमय आजाराची माहिती जाहीर करणाऱ्या चुन्या जिल्ह्याच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी फेलिस्ता किसांदू यांना टंझानिया सरकारने निलंबित केले आहे.

रक्ताच्या उलट्या टंझानियामध्ये पसरलेल्या या रहस्यमय आजारामुळे बाधित झालेल्यांना होत आहेत. या आजारामुळे आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. या आजारामुळे आतापर्यंत ५० जण बाधित झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, किसांदू यांनी सांगितले की, पाऱ्याच्या संसर्गाचा तपास करण्यासाठी रक्ताच्या नमुन्यांचा तपास करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. पण कुठल्याही प्रकारच्या संसर्गाचे संकेत दिसत नसल्याचे टंझानियाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

तसेच अनावश्यकरित्या भीती पसरवल्याप्रकरणी किसांदू यांना निलंबित करण्यात आल्याचे सांगितले. एका वृत्त संस्थेला किसांदू यांनी सांगितले होते की, पोट आणि अल्सरचा त्रास बहुतांश पुरुष रुग्णांमध्ये जाणवला आणि त्यांना सिगारेट तसेच हार्ड ड्रिंकचा वापर न करण्याचा सल्ला देण्यात आला होता.

त्याचबरोबर त्यांनी सांगितले होते की, रक्त आणि पाण्याच्या नमुन्यांची वरिष्ठ सरकारी केमिस्ट तपासणी करणार आहेत. जेणेकरून पाऱ्यामुळे झालेल्या प्रदूषणाची माहिती घेता येईल. दरम्यान, इफूम्बोच्या एका वॉर्डमध्ये या रहस्यमय आजारामुळे हे मृत्यू झाले आहेत. या वॉर्डमध्ये भरती करण्यात आलेल्या रुग्णांना रक्ताची उलटी झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पण या प्रकरणाकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला टंझानियाचे आरोग्यमंत्री डोरोथी ग्वाजिमा यांनी दिला आहे. तसेच किसांदू यांना लोकांमध्ये भीती निर्माण केल्या प्रकरणी १० दिवसांसाठी निलंबित करण्याचा सल्ला दिला आहे.