ट्विटरला झटका देत माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने स्वदेशी मायक्रो ब्लॉगिंग साईट Koo वर उघडले अकाऊंट


नवी दिल्ली – केंद्र सरकारने शेतकरी आंदोलनात संघर्षाचे केंद्र ठरलेल्या ट्विटरला धक्का देण्याची रणनीती सुरु केल्याची चर्चा आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ट्विटरला झटका देण्यासाठी स्वदेशी मायक्रो ब्लॉगिंग साईट कू (Koo) वर अकाउंट उघडले आहे, ही माहिती घरेलू कंपनीने दिली आहे. भारत सरकारने गेल्या आठवड्यात 257 अकाउंटवर बंदी घालण्याची केलेली विनंती ट्विटरने फेटाळल्यानंतर हा बदल दिसून येत आहे.

कू वर आयटी मंत्रालयाशिवाय अन्य सरकारी विभागांनीही खाते उघडलं आहे. कू वर माय गाव, डिजिटल इंडिया, इंडिया पोस्ट, नॅशनल इनफोर्मेटिक्स सेंटर (एनआईसी), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड इनफोर्मेशन टेक्नोलॉजी, कॉमन सर्व्हिस सेंटर, उमंग अॅप, डिजी लॉकर, नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया यांनी देखील व्हेरीफिकेशन केले आहे.

शेतकरी आंदोलनावर पॉपस्टार रिहाना आणि पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी ट्विट केल्यानंतर भारतीय सेलिब्रिटींनी त्याला ट्विटरवरून उत्तर दिले होते. ट्विटरनेही या घडामोडींमध्ये काही अकाऊंटवर बंदी घालण्याची सरकारची मागणी फेटाळली. 10 महिन्यांपूर्वी कू अॅप सुरु करण्यात आले होते. केंद्र सरकारने आयोजित केलेल्या आत्मनिर्भर अॅप स्पर्धेत कू ने बाजी मारली होती.

केंद्र सरकारने ट्विटरला शेतकरी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या घटनांमध्ये #ModiPlanningFarmerGenocide या हॅशटॅगशी संबंधित सर्व मजकूर हटवण्याचे आदेश दिले होते. केंद्र सरकारच्या आदेशाचे पालन केले नाही तर कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा देखील केंद्र सरकारने ट्विटरला दिला आहे. सरकारने या संदर्भात ट्विटरला नोटिस देखील बजावली आहे.