दहावी नापास माणसाला केंद्रात मंत्रिपद मिळावे, हे तर दुर्दैवच : विनायक राऊत


सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार नारायण राणे यांना मंत्रिपद मिळणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु असताना शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी टोला लगावला. नारायण राणेंसारख्या एका दहावी नापास नॉन मॅट्रिक माणसाला एवढ्या मोठ्या भारत देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर ते सिंधुदुर्गाचे दुर्दैव असेल, अशी बोचरी टीका विनायक राऊतांनी केली.

एकदा नव्हे, तर तीन वेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नारायण राणे यांनी फोन केला होता. तीन-तीन वेळा फोन केला म्हणून मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून राणेंची विचारपूस केली आणि काय काम आहे ते विचारुन घेतले. गृहमंत्री अमित शहांना खुश करण्यासाठी नारायण राणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिव्या द्यायचे काम करतात, राणेंचा तो परीपाट असल्याचे म्हणत विनायक राऊत यांनी आधीही टीका केली होती.

शिवसेनेने राणेंच्या हॉस्पिटलला कदापिही खो घालण्याचा प्रयत्न केला नाही, उलट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जेव्हा फाईल आली, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी तातडीने मंजुरी देण्याचे काम केले. जो प्रस्ताव रखडला होता तो राणेंच्या कंगालपणामुळे, असा निशाणाही विनायक राऊत यांनी साधला.

नारायण राणे आणि अमित शहा यांच्यासारख्या समविचारी लोकांची युती झाली असेल. ही युती लाईफटाईम टीको अशी अपेक्षा आहे. खोटारडेपणाचे राजकारण भाजपकडून सुरु आहे. जी सत्ता केंद्रात आली आहे, ती निष्ठूरपणे राबवायची हा त्यांचा एकमेव धंदा आहे. विरोधात जो गेला त्याच्या पाठी ईडी लावायची, अशी टीकाही राऊतांनी केली.