कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या क्रमवारीत इंग्लंडची पहिल्या क्रमांकावर झेप, भारताची चौथ्या स्थानी घसरण


नवी दिल्ली – चेन्नई कसोटी सामन्यात इंग्लंडकडून विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागंले. इंग्लंड संघाने भारतीय संघाचा २२७ धावांनी दारुण पराभव करत चार कसोटी सामन्याच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. जो रुटच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवत भारत दौऱ्याची दणक्यात सुरुवात केली आहे. भारतीय संघाने या पराभवासह आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतील अव्वल स्थान गमावले आहे. पहिल्या स्थानावरुन भारतीय संघाची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. दुसरीकडे भारतावर मोठा विजय मिळवत इंग्लंडने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.

आयसीसीने चेन्नई येथील पहिल्या कसोटी सामन्यानंतर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे गुण आणि क्रमवारी जारी केली आहे. त्यानुसार इंग्लंडचा संघ अव्वल स्थानावर पोहचला आहे. तर पहिल्या क्रमांकावर असणारा भारताचा संघ चौथ्या स्थानावर घसरला आहे. ७० टक्क्यांसह न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी टक्के आहे.


११ विजय आणि चार पराभव इंग्लंड संघाने स्विकारले आहेत. तर तीन सामने अनिर्णीत राखले आहेत. इंग्लंड संघाच्या नावावर ४४२ पॉईंट असून त्यांची विजयाची टक्केवारी ७०.२ एवढी आहे. ९ विजय भारतीय संघाने मिळवले आहेत. तर चार सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. एक सामना अनिर्णीत राखला आहे. भारतीय संघाच्या विजयाची टक्केवारी ६८.३ एवढी आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचा आगामी दक्षिण आफ्रिका दौरा स्थगित करण्यात आल्यामुळे त्याचा अप्रत्यक्ष फायदा कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानी असलेल्या न्यूझीलंडला झाला आणि त्यांना थेट फायनलचे तिकीट मिळाले. पण न्यूझीलंडविरूद्ध अंतिम सामन्यात कोणता संघ खेळणार याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. या स्थानासाठी भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तिन्ही संघांना संधी आहे.