पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा भारतावर दणदणीत विजय


चेन्नई – पाहुण्या इंग्लंड संघाने भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात यजमानांवर २२७ धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि इंग्लंडने ४ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. फलंदाजीसाठी पहिले तीन दिवस अनुकूल असणाऱ्या चेन्नईच्या खेळपट्टीने शेवटच्या दोन दिवसांत गोलंदाजांच्या बाजूने कौल दिला. भारताचा चौथा डाव ४२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना १९२ धावांवर आटोपला. कर्णधार विराट कोहली याने एकाकी झुंज देत ७२ धावा केल्या, पण त्याचे प्रयत्न तोकडे पडले. इंग्लंडकडून जॅक लीचने ४ तर जेम्स अँडरसनने ३ गडी टिपत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.