कोरोनाच्या उत्पत्तीचा शोध घेण्यासाठी चीनमध्ये दाखल असलेल्या WHOच्या टीम कडून मोठी अपडेट


बीजिंग – चीनमधील वुहान शहरात कोरोनाच्या उत्पतीबाबत तपास करण्यासाठी दाखल झालेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) पथकाकडून महत्वाची माहिती देण्यात आली आहे. शहरात डिसेंबर २०१९ च्या आधी कोरोनाचे कोणतेही संकेत नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटना आणि चिनी तज्ञांच्या प्रमुखांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा संसर्ग डिसेंबर २०१९ च्या आधी येथील लोकांमध्ये झाल्याचे कोणतेही संकेत नाहीत. कोरोनाचा फैलाव याआधी शहरात झाल्याचेही कोणते पुरावे सापडलेले नसल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

कोरोनाचा संसर्ग वुहान येथूनच झाल्याचे सांगण्यात आले होते. कोरोनाचा फैलाव वुहान येथील प्रयोगशाळेतूनच झाला आणि जगभरात पसरला असा दावा केला जात आहे. पण याचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेचे बेन एम्ब्रेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनासंबंधी वुहानमधील तपासात अनेक नव्या गोष्टी समोर आल्या आहेत, पण मोठा बदल झालेला नाही. डिसेंबर २०१९ मध्ये वुहान मार्केटबाहेर प्रसार झाल्याचे पुरावे पथकाला सापडले असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान डिसेंबर २०१९ पूर्वी वुहान किंवा इतर कुठेही कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाल्याचा पुरावा पथकाला सापडला नसल्याचे बेन एम्ब्रेक यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

कोरोना संसर्ग नेमक्या कोणत्या प्राण्यामुळे झाला यासंबंधी कोणतेही ठोस पुरावे नसल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे. वटवाघूळाच्या माध्यमातून प्रसारित झालेल्या कोरोनाचा संसर्ग इतर प्राण्याच्या मार्फत माणसांपर्यंत पोहोचल्याची शक्यता असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. आपली सविस्तर चर्चा चिनी वैज्ञानिकांसोबत झाल्याचे बेन एम्ब्रेक यांनी सांगितले आहे. जागतिक प्रसारमाध्यमे तसेच आपल्या रिपोर्टमध्ये यावेळी करण्यात आलेल्या दाव्यांवरही चर्चा झाली. यावेळी काही वैज्ञानिकांनी हे निराधार असून तपास करताना यामध्ये वेळ घालवता कामा नये असे सांगितले. चीनमधील वुहान शहरात डिसेंबर २०१९ मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता.