आक्रमक झालेल्या फारुख अब्दुल्लांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; प्रभू श्रीराम फक्त तुमचे नाहीत


नवी दिल्ली – आंदोलक शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्याचे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी मोदी सरकारला आवाहन केले आहे. मोदी सरकारवर लोकसभेत बोलताना आक्रमक झालेल्या फारुख अब्दुल्ला यांनी जोरदार हल्लाबोल करताना दुसरीकडे ४जी सेवा जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा सुरु केल्याबद्दल आभार मानले आहेत. तसेच कोरोना लसची निर्मिती करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञ आणि सीरम इन्स्टिट्यूटचे अभिनंदन केले आहे.

या दरम्यान फारुख अब्दुल्ला यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. शेतकरी कायदे आपण तयार केले आहेत. शेतकऱ्यांची कायदे रद्द करावेत अशी इच्छा आहे. त्यांच्याशी चर्चा केल्याने काय नुकसान होणार आहे?, अशी विचारणा फारुख अब्दुल्ला यांनी केली. या समस्येवर तोडगा काढा, तोडगा काढण्यासाठी आपण येथे आलो आहोत, अडथळे निर्माण कऱण्यासाठी नसल्याचे आवाहन यावेळी त्यांनी केंद्राला केले.

रक्ताच्या बाटलीकडे पाहून डॉक्टर कधीही हे हिंदूचे आहे की मुस्लीम व्यक्तीचे असे विचारत किंवा सांगत नाही. देवाने सर्वांना समान बनवले आहे. मंदिरात तुम्ही आणि मशिदीत मी जातो, असे फारुख अब्दुल्ला म्हणाले आहेत. यावेळी फारुख अब्दुल्ला प्रभू श्रीराम संपूर्ण जगाचे असल्याचा उल्लेख केला. संपूर्ण जगाचे प्रभू श्रीराम आहेत. आम्हा सर्वांचे प्रभू श्रीराम आहेत. कुराणदेखील फक्त आमचे नसल्याचेही ते म्हणाले.

देव आणि अल्लाह एकच आहे. जर तुम्ही फरक केला तर देश तुटेल. जर तुम्ही काही चूक केली तर आम्ही ती सुधरावू आणि आम्ही काही चूक केली तर तुम्ही सुधरावू शकता. अशाच पद्धतीने देश चालतो. आम्हाला तुम्ही आज पाकिस्तानी, खलिस्तानी, चिनी म्हणता. आम्हाला येथेच जगायचे आहे आणि येथेच मरायचे आहे. मी कोणाला घाबरत नसल्याचे ते म्हणाले.

धार्मिक ग्रंथाशी शेतकरी कायद्यांची तुलना करताना फारुख अब्दुल्ला म्हणाले की, हे कायदे म्हणजे काही धार्मिक ग्रंथ नाहीत, ज्यामध्ये बदल करु शकत नाही. कायदे रद्द करण्याची मागणी जर होत आहे तर त्यांच्याशी चर्चा का करत नाही? कृपया हा अभिमानाचा विषय केला जाऊ नये. देशात प्रत्येकाने एकमेकांचा आदर केला पाहिजे.

आपण जेव्हा जवाहरलाल नेहरु, सरदार पटेल, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि इतर नेत्यांकडे बोट दाखवता, तेव्हा मला खूप वाईट वाटते. उद्या तुम्ही सत्तेत नसाल, तेव्हा आपण या पंतप्रधानांवर बोलणार आहात का? ही भारतीय परंपरा नाही. जे गेले आहेत, त्यांचा आदर करा, अशा शब्दांत मोदी सरकारला फारुख अब्दुल्ला यांनी खडसावले.