मोदींची प्रतिष्ठा कमी होईल अशी टीका आम्ही कधीही करणार नाही – संजय राऊत


मुंबई – नवी दिल्लीच्या वेशीवर कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर भाष्य केले असून चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. मोदी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना बोलत होते. त्यांनी यावेळी विरोधकांवर टीकादेखील केली. देशात अशी नवी आंदोलनजीवी जमात उदयाला आली आहे, त्यांच्यापासून जनतेने सावध रहावे, असे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. मोदींच्या या टीकेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

देशाच्या पंतप्रधानांच्या भूमिकेचा आदर राहिला पाहिजे. राजकीय मतभेद एका बाजूला, पंतप्रधान सांगत आहेत तेव्हा त्यावर आम्ही विश्वास ठेवतो. पण चर्चेसाठी पंतप्रधानांनी पुढाकार घेतला पाहिजे, शेतकरी अज्ञान आहेत. त्यांना त्यांची जमीन, पीक, एमएसपी यापलीकडे काही माहिती नाही. तुम्ही सगळे ज्ञानदेव आहात, तुम्ही भिंत चालवू शकता….भिंत चालवा आणि गाझीपूरला चला, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.

आंदोलन जर हायजॅक होत आहे असे वाटत असेल तर चार शेतकरी नेत्यांना बोलवा आणि थेट चर्चा करा. मागील तीन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची दखल घेणार की नाही? संसदेत भाषण केले, बाहेर भाषण केले पण निष्पन्न काय झाले?, अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे.

पुढे ते म्हणाले की, मला पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आदर आहे. त्यांच्याविषयी देशाने आदर ठेवला पाहिजे. त्यांच्या काही भूमिका पटत नसतील, आपण त्यावर टीका करतो. पण पंतप्रधानपदाची आणि त्या व्यक्तीची प्रतिष्ठा कमी होईल अशी टीका आम्ही कधीही करणार नाही. सर्व गोष्टी मोदींनी खिलाडू वृत्तीने स्वीकारल्या पाहिजेत त्यातच लोकशाहीचे कल्य़ाण आहे.