इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची खराब सुरुवात


नवी दिल्ली – भारतीय संघाच्या दुसऱ्या डावाची इंग्लंड संघाने दिलेल्या ४२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवात खराब झाली आहे. भारतीय संघाने चौथ्या दिवसाखेर एका गड्याच्या मोबदल्यात ३९ धावांपर्यंत मजल मारली आहे. सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा तिसऱ्या सत्रात स्वस्तात माघारी परतला आहे. फिरकीपटू लीचने रोहित शर्माला त्रिफाळाचीत बाद केले. अवघ्या १२ धावांवर रोहित शर्मा बाद झाला. भारतीय संघाला चौथ्या दिवसाअखेर विजयासाठी अद्याप ३८१ धावांची गरज आहे. भारतीय संघाला अखेरच्या दिवशी ९० षटकांमध्ये ३८१ धावा करायच्या आहेत. तर इंग्लंड संघाला ऐतिहासिक विजयासाठी ९ गडी बाद करावे लागतील. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल १५ आणि अनुभवी चेतेश्वर पुजारा १२ धावांवर नाबाद होते. भारतीय संघ अंतिम दिवशी सामना विजयाच्या दिशेने पावले उचलण्याची शक्यता असल्यामुळे सामना रंगतदार अवस्थेत पोहचला आहे.

इंग्लंड संघाने चेन्नई येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावातील मोठ्या आघाडीच्या बळावर भारतीय संघाला विजयासाठी ४२० धावांचे आव्हान दिले आहे. पहिल्या डावात २४१ धावांची आघाडी असतानाही इंग्लंड संघाने फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या डावांत अचूक टप्यावर मारा करत इंग्लंड संघाला १७८ धावांवर रोखले. इंग्लंड संघाकडे दोन्ही डावांत ४१९ धावांची आघाडी आहे. भारतीय संघाला विजयासाठी ४२० धावांची आवशकता आहे. दुसऱ्या डावात फिरकीपटू आर. अश्विन याने सर्वाधिक ६ बळी घेतले. नदीमला दोन तर बुमराह आणि इशांत शर्मा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

भारतीय संघाला चौथ्या दिवशी ३३७ धावांवर रोखल्यानंतर इंग्लंड संघाने २४१ धावांची आघाडी घेतली. पहिल्या डावात इंग्लंड संघाने ५७८ धावांचा डोंगर उभा केला होता. दुसऱ्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर बर्न्स शून्यावर बाद झाला. त्यानंतर डॉम सिबली (१६), डॅन लॉरेन्स (१८), बेन स्टोक्स (७) आणि जो रूट (४०) एकापाठोपाठ एक जण फटकेबाजी करण्याच्या नादात बाद झाले. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या फलंदाजीवर भारतीय संघाच्या विजयाची मदार आहे. दिग्गज फलंदाजाच्या साथीला शुबमन गिल, पंत आणि सुंदर यासारखे नवखे फलंदाजही आहेत.

भारतीय संघ पहिल्या डावात २४१ धावांनी पिछाडीवर असताना फॉलोऑन न देता इंग्लंड संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण अश्विनने दुसऱ्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर इंग्लंडला धक्का दिला. पहिल्याच चेंडूवर अश्विन याने सलामीवीर फलंदाज रोरी बर्न्स याला अजिंक्य रहाणेकरवी झेलबाद केले. दुसऱ्या डावात पहिल्याच चेंडूवर बळी घेत ११४ वर्षापूर्वीचा विक्रम मोडीत काढला.कसोटी क्रिकेटच्या इतिहासात मागील ११४ वर्षांत डावाच्या पहिल्याच चेंडूवर एकाही फिरकी गोलंदाजाला बळी घेता आला नव्हता. पण अश्विन याने चेन्नई कसोटी पहिल्या चेंडूवर बळी घेत विक्रम मोडीत काढला आहे. यापूर्वी १८८८मध्ये इंग्लंडच्या बॉबी पील यांनी ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक बेन्नेर्मनला बाद करून प्रथम हा पराक्रम केला होता. त्यानंतर १९०७मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या अल्बर्ट व्होग्लर यानी इंग्लंडच्या टॉम हेयबर्ड यांना बाद केले. त्यानंतर तब्बल ११४ वर्षानंतर अश्विनने हा मान पटकावला.

इशांत शर्माने दुसऱ्या डावांत गोलंदाजी करताना लॉरेन्सला बाद करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. इशांतच्या नावावर इंग्लंडविरोधातील मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी ९७ कसोटी सामन्यात २९७ बळींची नोंद होती. चेन्नई कसोटी सामन्यातील पहिल्या डावात इशांत शर्माने दोन बळी घेतले. तर दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला विकेट मिळवत ३०० बळींचा पल्ला पार केला आहे. ९८ व्या कसोटी सामन्यात इशांत शर्माने ३०० बळी घेतेले आहेत. इशांत शर्माआधी कपिल देव आणि झहीर खान या दिग्गजांनी कसोटी सामन्यात ३०० बळी घेतले आहेत. ३०० पेक्षा जास्त विकेट घेणारा इशांत शर्मा सहावा भारतीय गोलंदाज ठरला आहे.