टेलिग्राम ठरले सर्वाधिक डाऊनलोड होणारे अ‍ॅप


या वर्षांच्या सुरुवातीला नवीन फिचर आणण्याऐवजी नव्या अटी आणि शर्तींसह प्रायव्हसी पॉलिसी व्हॉट्सअॅपने सादर केली आहे. या अटी-शर्ती जर तुम्ही अमान्य केल्या तर तुमचे अकाऊंट डिलीट केले जाईल. कंपनीने या अटी मान्य करण्यासाठी युजर्सना 8 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली होती. अनेक युजर्स व्हॉट्सअॅपच्या या नव्या धोरणामुळे नाराज आहेत. त्यामुळे व्हॉट्सअॅपच्या या अटी मान्य करण्याऐवजी व्हॉट्सअॅप वापरणे बंद करण्यास अनेकांनी प्राधान्य देण्याचे ठरवल्यामुळे त्यामुळे अशा युजर्सनी अन्य इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप्सकडे मोर्चा वळवला आहे. त्यातही बहुतांश युजर्स हे त्यांचे व्हॉट्सअॅप अकाऊंट डिलीट करुन टेलिग्राम आणि सिग्नलसारख्या इतर मेसेजिंग अ‍ॅप्सवर शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा व्हॉट्सअॅपला जोरदार फटका बसला आहे.

आपल्या गोपनीयता धोरणाबाबत व्हॉट्सअ‍ॅपने आतापर्यंत दोन वेळा स्पष्टीकरण दिले आहे. तसेच युजर्सचा डेटा कोणासोबतच शेअर केला जाणार नसून सर्व डेटा सुरक्षित असल्याचे स्पष्टीकरण देऊन व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युजर्संना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु लोक गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने व्हॉट्सअ‍ॅप बंद करुन सिग्नल किंवा टेलिग्राम अ‍ॅपवर शिफ्ट होत असल्यामुळे या महिन्यात नव्याने अ‍ॅप्स इन्स्टॉल करण्याच्या बाबतीत व्हॉट्सअ‍ॅप पिछाडीवर आहे. तर टेलिग्राम आणि सिग्नल या दोन अ‍ॅप्सनी बाजी मारली आहे. या दोन्ही अ‍ॅप्सना युजर्सकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

टेलिग्राम जानेवारी 2021 मध्ये सर्वाधिक डाऊनलोड केले जाणारे नॉन गेमिंग अ‍ॅप ठरले आहे. जगभरातील टेलिग्रामच्या एकूण डाऊनलोड्सपैकी 24 टक्के डाऊनलोड्स हे भारतातून झाले आहेत. याबाबतचा खुलासा सेंसर टॉवरच्या लेटेस्ट रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. जगभरात गेल्या महिन्यात (जानेवारी) 63 मिलियन्स (6.3 कोटी) वेळा टेलिग्राम डाऊनलोड करण्यात आले आहे. यापैकी 15 मिलियन्स (1.5 कोटी) डाऊनलोड्स एकट्या भारतात झाले आहेत. टीक-टॉकने सर्वाधिक डाऊनलोड केल्या जाणाऱ्या नॉन गेमिंग अ‍ॅप्सच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. जरी भारतात टीक-टॉक बॅन असले तरी जगभरात या अ‍ॅपला चांगलीच पसंती मिळत आहे. टिकटॉकनंतर सिग्नल, फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप या अ‍ॅप्सचा अनुक्रमे तिसरा, चौथा, पाचवा क्रमांक लागतो. सेंसर टॉवरच्या लेटेस्ट ब्लॉग पोस्ट, टॉप अ‍ॅप्स वर्ल्डवाईड फॉर जानेवारी 2021 2021 मध्ये दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्सअ‍ॅपसह टीक-टॉक, सिग्नल आणि फेसबुकला टेलिग्रामने मागे टाकले आहे.

व्हॉट्सअॅपमध्ये युजर्सची मागणी असलेले प्रत्येक लहान-मोठे फिचर आहे. मग ते पर्सनल अथवा ग्रुप चॅट असो किंवा व्हिडीओ/ऑडियो कॉल असेल. युजर्सच्या सोयीचे प्रत्येक फिचर व्हॉट्सअॅपमध्ये देण्यात आले आहे. इन्स्टाग्रामप्रमाणे व्हॉट्सअॅप तुम्हाला स्टोरी अपलोड करण्याचे फिचर देते. यात काही मर्यादा देखली आहेत, जसे की एका ग्रुपमध्ये केवळ 256 लोकांनाच सहभागी होता येते. व्हिडीओ किंवा ऑडियो कॉलमध्ये एकावेळी केवळ 8 च जणांना सहभागी होता येते. सर्व प्रकारच्या फाईल्स व्हॉट्सअॅपवर शेअर करता येतात, परंतु त्यावर साईज लिमिट आहे. फोटो, व्हिडीओ आणि ऑडियो फाईल्ससाठी ही मर्यादा 16MB पर्यंत आहे. डॉक्युमेंट्सच्या बाबतीत ही मर्यादा 100MB पर्यंत आहे. परंतु युजर्स सध्या व्हॉट्सअॅपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे कंपनीवर नाराज आहेत.

आपल्या युजर्सना टेलिग्राम अॅप देखील अनेक फिचर्स देते. तुम्हाला टेलिग्रामवर व्हॉट्सअॅप प्रमाणे चॅटिंग, ग्रुप चॅट आणि चॅनेलसारखे महत्त्वाचे फिचर्स दिले जातात. तसेच इतरही अनेक फिचर्स दिले जातात. टेलिग्रामवरील ग्रुप्समध्ये, चॅनेल्समध्ये 2 लाख युजर्स सहभागी होऊ शकतात. ही मर्यादा व्हॉट्सअॅपमध्ये 256 एवढी आहे. टेलिग्रामवरील ग्रुप्समध्ये तुम्ही बॉट, पोल, क्विज, हॅशटॅगसह अनेक इंस्ट्रूमेंट्सचा वापर करु शकता. त्यामुळे तुमचे चॅटिंग अधिकच इंटरेस्टिंग होईल. टेलिग्राम तुम्हाला Self Destructing Messages ची सुविधा देते. तुम्ही टेलिग्रामवर 1.5 जीबीपर्यंतच्या फाईल्स शेअर करु शकता. या अॅपमध्ये अँड्रॉईड (Android) आणि आयओएस डिव्हाईसवर (iOS devices) व्हाईस आणि व्हिडीओ कॉल (video call) हे दोन्ही फिचर्स आहेत. तसेच हे अॅप पूर्णपणे सुरक्षित आहे. कंपनीने दावा केला आहे की, हे अॅप एंड टू एंड एनक्रिप्टेड आहे. या अॅपमध्ये तुम्हाला सिक्रेट चॅटचा पर्यायही देण्यात आला आहे. यापैकी कोणतेही फिचर व्हॉट्सअॅपमध्ये देण्यात आलेले नाही.

आपल्या युजर्सना सिग्नल अॅप सुरक्षित मेसेज, ऑडियो आणि व्हिडीओ कॉलसारखे फिचर्स देते. या अॅपवरील सर्व प्रकारचे संवाद हे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड (end-to-end encrypted) असतात. या अॅपमध्येदेखील ग्रुप्सचा पर्याय आहे. परंतु या अॅपवर एकच मेसेज खूप लोकांना पाठवता येत नाही. या अॅपने नुकतेच ग्रुप कॉलिंग हे फिचर लाँच केले आहे. सिग्नल अॅपमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण फिचर देण्यात आले आहे, ते म्हणजे नोट-टू-सेल्फ (Note to Self). या फिचरद्वारे तुम्ही स्वतःला मेसेज पाठवू शकता. स्वतःचा एक वेगळा ग्रुप बनवू शकता.