मोदी सरकारकडून सेलिब्रिटींवर ट्विट करण्यासाठी दबाव?; राज्य सरकारकडून चौकशीचे आदेश


मुंबई – आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानाने दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर ट्विट केल्यानंतर देशभरात एकच चर्चा सुरु झाल्यानंतर आपला देश विभागण्याचा प्रयत्न होत असून तसे होऊ देऊ नका, असे आवाहन अनेक खेळाडू तसेच बॉलिवूड सेलिब्रिटींनी ट्विट करत केले होते. पण काही सेलिब्रिटींचे यावेळी ट्विट हे समान असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. ट्विट करण्यासाठी मोदी सरकारने खेळाडू तसेच सेलिब्रिटींवर दबाव टाकल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यादरम्यान सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.

काँग्रेसकडून सेलिब्रिटींच्या ट्विटचा मुद्दा झूम मीटिंदरम्यान उपस्थित करण्यात आला. सेलिब्रिटींवर दबाव टाकण्यात आला होता, याबद्दल माहिती घ्यावी अशी मागणी काँग्रेसने केली. अनिल देशमुख यांनी त्यावर गुप्तहेर विभाग यासंबंधी तपास करणार असल्याची माहिती दिली आहे. यावेळी खासकरुन अक्षय कुमार आणि सायना नेहवालच्या ट्विटचा उल्लेख करण्यात आला. दोन्ही ट्विटमध्ये असणाऱ्या साधर्म्य आश्चर्यकारक असल्याचे सांगण्यात आले.

यासंबंधी एबीपी माझाशी बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे की, व्यक्तिगत पातळीवर कोणीही मत व्यक्त करत असेल तर त्यावर आक्षेप असण्याचे कारण नाही. पण ट्विटची वेळ, भाषा पाहिली तर हे भाजपच्या स्क्रिप्टनुसार करण्यात आले का? याबाबत शंका निर्माण होते. अक्षय कुमार आणि सायना नेहवाल यांच्या ट्विटमधील शब्द समान आहेत. सुनील शेट्टीच्या ट्विटमध्ये भाजपच्या एका पदाधिकाऱ्याचाही उल्लेख असल्यामुळे भाजपच्या स्क्रिप्टप्रमाणे हे करण्यात आले का? ही शंका निर्माण होते.

संविधानिक संस्था तसेच विरोधी सरकारांवर देशपातळीवर मोठा प्रचंड दबाव आहे. जो कोणी विरोध करेल त्यांच्यावर दबाव आणला जातो. त्याच पार्श्वभूमीवर यांच्यावरही दबाव आणलेला असू शकतो. दबावात राहता कामा नये आणि बोलायचे असेल तर निर्भीडपणे बोलावे ही महाविकास आघाडी सरकारची जबाबदारी आहे. हे काम मोदी सरकार करत असेल आणि ते हे करण्याची शक्यता असल्यामुळे आम्ही चौकशीची मागणी केली होती. त्याचे गांभीर्य ओळखून गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती सचिन सावंत यांनी दिली आहे.