सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना घराजवळच मिळणार परीक्षा केंद्र


नवी दिल्ली – या वर्षी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) बोर्ड परीक्षांच्या केंद्रांची संख्या दुप्पट केली जाईल. परीक्षा केंद्र प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या घराच्या जवळच मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना बोर्डाचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी सांगितले की, मोठ्या संख्येत सर्व सुविधा असलेल्या परीक्षा केंद्रांचा बोर्ड शोध घेत आहे. मे-जूनमध्ये ज्या भागांत भीषण उन्हाळा असतो, तेथे ज्या शाळांत उन्हापासून बचावासाठी पुरेशा सुविधा असतील, त्या शाळांतच परीक्षा केंद्र असेल. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तीन तासांत उष्ण वातावरणामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये हा त्यामागील हेतू आहे.

पेपर तपासण्याची प्रक्रिया परीक्षा सुरू झाल्यानंतर १० व्या दिवशी म्हणजे १४ मेपासून सुरू होईल. १५ जुलैपर्यंत बोर्ड परीक्षांचे निकाल कुठल्याही स्थितीत लागावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढे भारद्वाज यांनी सांगितले की, परीक्षेचा कालावधी बराच विचार करून निश्चित करण्यात आला आहे. जास्त उन्हाळा असलेल्या भागांत परीक्षा केंद्रांबाबत कुठलीही सूचना किंवा आक्षेप आला तर सीबीएसई त्यावर गांभीर्याने विचार करेल. तथापि, विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत. कोरोनानंतरच्या स्थितीत बोर्ड परीक्षांसाठी सीबीएसई स्टॅँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) तयार करत आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम परीक्षा केंद्रांवर लागू व्हावा यासाठी प्रत्येक वर्गात परीक्षार्थींची संख्या कमी केली जात आहे.

भारद्वाज म्हणाले, ९वी व ११वी परीक्षांबाबत बोर्डाने शाळांना निर्देश दिलेले नाहीत. तरीही बोर्डाकडून शाळांना काही मदत हवी असेल तर त्यांनी आम्हाला सांगावे. सर्वतोपरी मदत त्यांना केली जाईल. दहावी, बारावीशिवाय इतर सर्व वर्गांच्या परीक्षा व निकालांची प्रक्रिया ३१ मार्चच्या आधी पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. परीक्षा केंद्रांच्या निवडीसाठी अद्याप बराच अवधी आहे. एखाद्या शाळेकडून कडक तापमानामुळे केंद्राबाबत आक्षेप किंवा सूचना आली तर त्यावर गांभीर्याने विचार केला जाईल.

भारद्वाज म्हणाले की, आता परिस्थितीत बरीच सुधारणा झाली आहे. कोरोना लसही आली आहे. पण तापमान वाढत असल्यामुळे सामान्य स्थितीत परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळांत येण्याचा पर्याय निवडावा. कोरोनाबाबत व्यापक व्यवस्था करण्याचे आणि विशेषत: विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत. एक एप्रिलपासून शाळांमध्ये सर्व इयत्तांचे नियमित सत्र सुरू होईल. उन्हाळ्याच्या नियमित आणि सामान्य सुट्याही मिळतील. त्यात जर कोरोना वर्षात लर्निंग गॅप राहिला तर तो पूर्ण होऊ शकेल.