शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक नितीन चौगुले यांची उचलबांगडी


सांगली : संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानमध्ये फूट पडली असून शिवप्रतिष्ठानचे सांगलीतील कार्यवाहक नितीन चौगुले यांना पदावरुन हटवण्यात आले आहे. नितीन चौगुले यांच्यावर कारवाई केल्याची माहिती एका व्हिडीओच्या माध्यमातून शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी दिली आहे. शिवप्रतिष्ठानच्या वतीने नितीन चौगुले यांना पदावरून हटवण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही.

एका व्हिडीओच्या माध्यामातून संघटनेच्या वतीने शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक नितीन चौगुले यांच्यावर कारवाई केल्याची माहिती देण्यात आली. या व्हिडीओमध्ये सांगण्यात आले आहे की, शिवप्रतिष्ठानचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी प्रसारित करित आहे की, नितीन चौगुले यांना शिवप्रतिष्ठानमधून निलंबित केले आहे, काढून टाकले आहे. तथापि, त्यांच्याशी कोणीही संबंध ठेवू नये.

यासंदर्भात एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्वतः नितीन चौगुले म्हणाले की, अद्याप कोणतेही अधिकृत कारण मला समजलेले नाही. आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांची मी भेट घेऊन त्यांना एक निवेदन मी दिले आहे. जी काही कारण असतील ती मला सांगण्यात यावीत. कारण दोन दिवसांपूर्वी आम्ही एकत्र होतो. शरजील उस्मानी आणि एल्गार परिषद यांच्याविरोधात दोन दिवसांपूर्वीच सांगलीत आंदोलन केले होते. त्यामुळे अध्यक्षांना मी निवेदन दिले आहे. मला उत्तर मिळेल. अद्याप याप्रकरणी माझी गुरुजींशी काहीच बोलणे झालेले नाही. तसेच मला कोणताही गुरुजींचा निरोप मिळालेला नाही. अध्यक्षांकडून माझ्या निलंबनाची घोषणा झाली, त्यामुळे मी त्यांनाच निवेदन दिलेले आहे.