एल्गार परिषदेच्या आयोजकांकडून शरजील उस्मानीची पाठराखण


पुणे – एल्गार परिषद २०२१च्या आयोजकांनी एका निवेदनाद्वारे अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता शरजील उस्मानी याला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. भारत आणि हिंदू समाजाबद्दल परिषदेत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शरजीलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे ३० जानेवारी २०२१ रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान, यापूर्वीच शरजीलच्या वक्तव्याबाबत एल्गार परिषदेचे एक आयोजक माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी माफी मागितली होती. शरजील चांगले बोलला पण त्याने ‘मनुवादी’ ऐवजी ‘हिंदू’ शब्द वापरला ही त्याची चूक झाल्याचे कोळसे पाटील यांनी म्हटले होते.

A statement from Sharjeel Usmani's speech on 30 January 2021 at the Elgar Parishad was misrepresented by Brahmhinical…

Posted by Bhima Koregaon Shaurya Din Prerana Abhiyan on Saturday, 6 February 2021

यासंदर्भात न्या. कोळसे पाटील यांनी इंग्रजी आणि हिंदीमध्ये शनिवारी संध्याकाळी ‘भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियान’ या आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर एक निवेदन दिले. त्यांनी यामध्ये म्हटले की, शरजील उस्मानी याने ३० जानेवारी रोजी झालेल्या एल्गार परिषदेत दिलेले भाषण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि त्यांच्या संघ परिवाराकडून चुकीच्या पद्धतीने दाखवलं जात आहे. शरजीलला लक्ष्य करुन संघ परिवाराने पुन्हा एकदा आपला धार्मिक विद्वेषाचा आणि जातीयवादी चेहरा दाखवून दिला आहे.

धार्मिक भावना दुखावल्याबद्दल आणि राजद्रोहाचा गुन्हा शरजीलवर दाखल करण्यात आला आहे. पण, शरजील उस्मानीच्या पाठीशी आम्ही एल्गार परिषदेचे आयोजक खंबीरपणे उभे असल्याचे कोळसे पाटील यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. तर भाजपने शरजीलवर कारवाईच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.