सणासुदीच्या निमित्ताने किंवा विवाहसोहोळ्यासारख्या प्रसंगांच्या निमित्ताने सोने खरेदी करणे हा अतिशय महत्वाचा मुद्दा असतो. सोने खरेदी करीत असताना काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेणे अगत्याचे ठरते. सोने विकत घेत असताना, आपण खरेदी केलेला नग ‘BIS हॉलमार्क’ने सर्टिफाय केलेला आहे किंवा नाही हे पाहून घेणे अतिशय महत्वाचे आहे. भारतामध्ये ‘BIS’, म्हणजेच ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डस्’च्या वतीने सोन्याच्या शुद्धतेची खात्री देणारे हॉलमार्कचे सर्टिफिकेशन असलेल्या सुवर्णालंकारांची विक्री करणाऱ्या, एकूण १३,७०० अधिकृत ज्वेलरी शोरूम्स आहेत. त्याशिवाय हे सर्टिफिकेशन देणारी ४३५ केंद्रे भारतभरामध्ये आहेत. परंतु भारतामध्ये आजही अनेक प्रांत असे आहेत जिथे हॉलमार्किंग सेन्टर्स किंवा हॉलमार्क असलेले अलंकार उपलब्ध असणाऱ्या शोरूम्स नाहीत. त्यामुळे आपण खरेदी करीत असलेले अलंकार हॉलमार्क विरहित नसल्याची खात्री करून घ्यावी.
BIS हॉलमार्क असलेल्या अलंकारांची विक्री करणाऱ्या अधिकृत ज्वेलरी शोरूम्सची माहिती BISच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच आपण खरेदी केलेल्या, हॉलमार्क असेलल्या सोन्याच्या शुद्धतेविषयी कोणतीही तक्रार असल्यास ही तक्रार या वेबसाईट वर नोंदविता येऊ शकते. भारतामध्ये, विशेषतः ग्रामीण भागांमध्ये हॉलमार्क नसलेल्या अलंकारांची विक्री मोठ्या प्रमाणावर होताना आढळते. या दागिन्यांची किंमत थोडी कमी असली, तरी हॉलमार्क सर्टिफिकेशन शुद्धतेची खात्री देणारे असल्यामुळे, हॉलमार्क विरहित अलंकारांची खरेदी करण्याचा मोह टाळावा.
सोने खरेदी करण्यापूर्वी सोन्याचा प्रती ग्राम मागे भाव किती आहे याची माहिती असणे आवश्यक आहे. हा दर निरनिराळ्या शहरांमध्ये वेगवेगळा असू शकतो. त्या त्या शहरातील ज्वेलर्स असोसियेशन्सच्या वतीने हे दर ठरविले जात असतात. मात्र भारतामधील मोठ्या, नामवंत जव्हेरींकडे सोन्याचे दर बहुधा एकसारखे असतात. सोन्याचा प्रती ग्राम मागे दर, खात्रीशीर वेबसाईटस् द्वारे माहिती केला जाऊ शकतो. तसेच अनेक वृत्तवाहिन्या देखील हे दर दररोज प्रसिद्ध करीत असतात.
सोन्याचे अलंकार खरेदी करताना त्यामध्ये प्रत्यक्ष सोन्याच्या किंमतीसोबतच ‘करणावळ’, म्हणजे मेकिंग चार्जेस, आणि ‘वेस्टेज’, म्हणजे घट यांची ही किंमत जोडलेली असते. त्यामुळे दहा ग्रामच्या अलंकारासाठी तीस हजार रुपये दिल्यानंतर दर ग्राम मागे तीन हजार रुपये इतकी रक्कम आपण देत असतो. सोन्याचा त्या दिवशीचा प्रती ग्रामचा भाव पाहता ही रक्कम किती अधिक आहे हे आपण समजून घेऊ शकतो. प्रती ग्राम मागे तीन हजार रुपये देताना, प्रत्यक्ष सोन्याचा त्या दिवशीचा प्रती ग्राम प्रमाणे असलेला भाव वजा केला, तर उरलेली किंमत करणावळ, घट आणि इतर कर यांसाठी भरली जात असते. या साठी सोने खरेदी पूर्वी त्या दिवशीचा प्रती ग्राम मागे भाव माहिती असणे गरजेचे ठरते. सोने खरेदी केल्यानंतर बिलाची पक्की प्रत आवर्जून घ्यावी. तसेच पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे सोने खरेदी केल्यास VAT कर भरावा लागतो, तसेच PANचे विवरण देणे ही आवश्यक असते.