सोनेरी स्तूपांनी आणि भव्य बुद्धमूर्तींनी नटलेली सुवर्णभूमी – म्यानमार

mynmar
पूर्वेला भारताच्या नजीक असलेल्या म्यानमार देशाला बर्मा या नावानेही ओळखले जाते. पूर्वेकडे स्थित असलेल्या आशियायी देशांमध्ये म्यानमार देशाला ‘सुवर्णभूमी’ म्हणूनही संबोधले जाते. बर्मा देशातील शहरांवरून हवाई सफर केली असता, या शहरांमध्ये सोन्याची चादरच जणू कोणी पसरून ठेवली असल्याचा भास होतो. सोनेरी स्तूप, मंदिर आणि पागोडा या देशामध्ये सर्वत्र नजरेला पडतात. व्यस्त शहरे असोत किंवा शांत खेडेगावे असोत, ही सोन्याची चादर सर्वदूर पसरलेली दिसते.
mynmar1
या देशामध्ये ठिकठीकाणी सोनेरी बुद्ध मंदिरे दृष्टीस पडतात. काही मंदिरे, किंवा बौद्ध धर्मशाळा उंच डोंगरांवर उभ्या आहेत, तर अगदी भर वसाहतीच्या ठिकाणी देखील लहान मोठी प्रार्थनास्थळे, मंदिरे मोठ्या प्रमाणावर दृष्टीस पडत असतात. या सर्व वस्तू सोनेरी आहेत. या सुवर्णभूमीला संपन्न करणारी इरावती नदी या देशातून वाहते. याच नदीच्या किनारी म्यानमार देशाच्या संस्कृतीचा उगम झाला आहे. डोंगरांवर बनलेली विशाल बौद्ध मंदिरे, सुंदर प्रसन्न हवामान, दूरवर पसरलेली वनराई आणि त्यांच्यामध्ये वसलेली लहानमोठी घरे हे दृश्यच नयनरम्य आहे. या देशामधील पर्वतराजीच्या परिसरामध्ये सातशे हून अधिक लहान मोठी मंदिरे आहेत. ही सर्व मंदिरे सोनेरी रंगाने नटलेली आहेत. बगान नामक शहराच्या जवळ तर तब्बल २२०० लहान मोठी मंदिरे, स्तूप आणि पागोडा आहेत.
mynmar2
अकराव्या शतकापासून ते तेराव्या शतकाच्या काळादरम्यान सर्वाधिक मंदिरांचे आणि प्रार्थनास्थळांचे निर्माण या देशामध्ये झाले. या काळामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार या देशामध्ये होत होता. म्यानमार देशाच्या परंपरेमध्ये सोन्याला अनन्यसाधारण महत्व दिले गेले आहे. येथे बांबूच्या पानांमध्ये सोने ठेऊन त्याचे अनेक ‘layers’ तयार केले जातात. या layersना हातोड्याने ठोकून त्यानंतर त्यांना लहान लहान चौकोनांमध्ये कापले जाते. ही सुवर्णपत्रे त्यानंतर मंदिरांचे निर्माण करण्यासाठी वापरली जातात. या देशामध्ये परंपरागत औषधांमध्ये देखील सोन्याचा वापर केला जातो. स्थानिक मद्यामध्ये देखील या सुवर्णपत्रांचा वापर केला जातो.
mynmar3
म्यानमार देशामध्ये सोने पवित्र धातू मानले गेले आहे. या देशातील नव्वद टक्के लोकसंख्या बौद्ध धर्मीयांची आहे. सोन्याला बौद्ध धर्मामध्ये सूर्याचे प्रतीक मानले गेल्याने या देशामध्ये सोन्याला महत्व दिले गेले आहे. येथे अतिशय खास प्रसंगी बनविण्यात येणाऱ्या पदार्थांमध्ये देखील अस्सल सोन्याचा वर्ख वापरला जातो.

Leave a Comment