असा ही विलक्षण योगायोग !

china
आपल्या आयुष्यामध्ये योगायोगानेच घडलेले किती तरी प्रसंग आपल्याला अनुभविण्यास मिळत असतात. त्या घटना किंवा त्या गोष्टी नेमक्या कशा घडल्या याचे कोणतेही कारण आपल्याला सापडत नाही, आणि म्हणूनच काही घटना निव्वळ योगायोग म्हणून आपल्या लक्षात राहतात. मात्र चीनचे रहिवासी असणाऱ्या या जोडप्याच्या बाबतीत घडलेला योगायोग मात्र फारच विलक्षण म्हणावा लागेल. ये आणि क्सू या जोडप्याच्या विवाहाला आता अकरा वर्षांचा काळ उलटला आहे. काही वर्षांपूर्वी, म्हणजेच या दोघांची भेट होण्याआधी हे दोघे २००० साली आपापल्या सुट्ट्यांच्या काळामध्ये चीनमधील क्विन्दागो या ठिकाणी असलेल्या ‘मे फोर्थ स्क्वेअर’ ला भेट देण्यासाठी गेले होते. त्याचवेळी ही योगायोगाची घटना घडली.
china1
एखाद्या पर्यटनस्थळाला भेट दिल्याची आठवण म्हणजे तिथे छायाचित्रे घेणे. तशीच आपापली छायाचित्रे ये आणि क्सू यांनी घेतली होती. आणि त्यांच्या बाबतीतला विलक्षण योगायोग इथेच घडला. येने घेतलेल्या छायाचित्रामध्ये या ठिकाणाला भेट देण्यासाठी आलेली क्सू देखिल दिसत आहे, तर क्सूच्या छायाचित्रामध्ये मागील बाजूस उभा असलेला ये स्पष्ट दिसत आहे. गंमतीची गोष्ट अशी, की या दोघांचाही त्या काळी एकमेकांशी परिचय नव्हता. मात्र विवाहाला तब्बल अकरा वर्षे उलटून गेल्यानंतर जेव्हा ही छायाचित्रे या दोघांच्या हाती लागली, तेव्हा एकमेकांच्या छायाचित्रांमध्ये एकमेकांना पाहून दोघांच्याही आश्चर्याला पारावार उरला नाही. त्यांच्या वेगवेगळ्या घेतल्या गेलेल्या छायाचित्रांमध्ये, मागे दिसत असणारी व्यक्ती आयुष्यामध्ये पुढे त्यांची जोडीदार बनून येणार आहे याची कल्पनाही दोघांनी केली नव्हती.
china2
ये आणि क्सूच्या विवाहाला अकरा वर्षांचा काळ लोटला असून, आता त्यांना जुळ्या मुली देखील आहेत. या दोघांची परस्परांशी भेट झाली ती २०११ साली चेंग्डू या ठिकाणी. त्यानंतर लवकरच दोघे विवाहबद्ध झाले. त्यानंतर अकरा वर्षांच्या अवधीनंतर क्सूच्या आईच्या घरी असलेला जुना फॅमिली अल्बम सहजच चाळत असताना ये आणि क्सू ला त्यांची जुनी छायाचित्रे सापडली आणि त्यांना हा विलक्षण योगायोग लक्षात आला. ही छायाचित्रे जिथे घेतली गेली तिथे या दोघांची उपस्थिती देखील आणखी एक योगायोग म्हणावा लागेल. खरे तर या सहलीसाठी ये ची आई येणार असून, ऐनवेळी ती आजारी पडल्याने तिच्या ऐवजी ये या सहलीसाठी आला. तर क्सूच्या आईची नुकतीच शस्त्रक्रिया झाली असल्याने हवापालट म्हणून क्सू देखील आपल्या आईसोबत याच ठिकाणी फिरायला आली होती. त्यामुळे या क्सू आणि ये च्या बाबतीत घडलेल्या या योगायोगाला निमित्त देखील ये आणि क्सूच्या आई जबाबदार होत्या, हा ही योगायोगच.

Leave a Comment