भाजपच्या ‘आयटी सेल’ला आता उत्तर देणार काँग्रेसचे ‘सोशल मीडिया वॉरिअर्स’


नवी दिल्ली – सोशल मीडियाचा सर्वसामान्यांच्या आयुष्यात शिरकाव झाल्यापासून राजकीय पक्षांच्या प्रचाराची दिशाच बदलून गेली आहे. राजकीय प्रचाराचे तंत्र २०१४ पासून बदलले असून, राजकीय पक्षांकडून आता मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर होताना दिसत आहे. राजकीय पक्षांचे राजकीय आखाड्यातील सोशल वॉरसाठी स्वतंत्र सेलच तयार झालेले असून, त्यातच आता सत्ताधारी भाजपच्या ‘आयटी सेल’ला काँग्रेस ‘सोशल मीडिया वॉरिअर्स’च्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्यात येणार आहे. त्यासाठी काँग्रेसकडून तब्बल पाच लाख वॉरिअर्सची भरती केली जाणार आहे.

यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडे या वृत्तवाहिनीने दिले आहे. काँग्रेसकडून लवकरच सोशल मीडियाचे काम करण्यासाठी पाच सदस्यांची भरती केली जाणार असून, सोमवारी त्याविषयी हेल्पलाईनची घोषणा केली जाणार असल्याचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. काँग्रेसला २०१४ पासूनच्या निवडणुकीत सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत आहे. काँग्रेसचा मागील दोन लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झालेला असल्यामुळे काँग्रेसकडून याचे आत्मचिंतन केले जात असून, सोशल मीडियाची राजकीय प्रचारात महत्त्वाची भूमिका असल्यामुळे काँग्रेसकडून हे पाऊल टाकण्यात येणार आहे.

पाच लाख सोशल मीडिया वॉरिअर्सची भरती काँग्रेसकडून केली जाणार आहे. काँग्रेसने हा निर्णय देशातील कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी घेतला आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये ५० हजार पदाधिकाऱ्यांचा निवड पक्षाकडून केली जाणार आहे. ज्यांच्या मदतीसाठी साडेचार लाख कार्यकर्ते असणार आहे. सोशल मीडियाला समर्पित वेब पेजेससोबतच एक हेल्पलाईन नंबर सुरू केला जाणार आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून ज्यांना सोशल मीडिया टीममध्ये सहभागी व्हायचे आहे, त्यांची माहिती संकलित करणार आहे. काँग्रेस सोशल मीडिया सेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सोशल मीडिया टीममध्ये काम करण्यास इच्छुक असणाऱ्यांची आधी चौकशी केली जाणार आहे. ही भरती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जाणार असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली.