नारायण राणेंची कबुली; होय, उद्धव ठाकरेंशी झाले माझे बोलणे


रत्नागिरी : शिवसेनेशी नारायण राणे यांचे राजकीय वैर सर्वश्रृत आहे. आज नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाकरिता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडवे येथे येत आहेत. मेडिकल कॉलेजचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. पण, मागील काही दिवसांमध्ये नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलेल्या फोनची चर्चा रंगली होती.

नारायण राणे यांनी मेडिकल कॉलेजच्या परवानगीसाठी उद्धव ठाकरेंना फोन केल्याचे शिवसेना सचिव आणि रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले होतं. राऊत यांनी 11 जानेवारी रोजी याबाबतचे वक्तव्य केले होते. नारायण राणे यांना यावर विचारले असता ते म्हणाले, मेडिकल कॉलेजच्या परवानगीचा काहीही संबंध हा राज्याशी येत नसल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मी फोन केला नव्हता. विनायक राऊत यांच्या बोलण्यात किंवा दाव्यात काहीही तथ्य नसल्याचे राणे यांनी म्हटले होते.

नारायण राणे यांनी ही प्रतिक्रिया 11 जानेवारी 2021 रोजी दिली होती. पण, केवळ महिनाभराच्या आतच होय, माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलणं झाल्याची कबुली त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी याची कबुली 6 फेब्रुवारी रोजी अर्थात कालच झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, उद्धव ठाकरेंशी बोलणे झाले याबाबत बोलताना त्यांनी आपल्यातील आक्रमकपणा मात्र कायम ठेवला होता,.

केंद्र सरकारच्या अखत्यारित मेडिकल कॉलेजचा विषय येतो. असे असले तरी राज्य सरकारकडून तुम्हाला काही त्रास झाला का? असा सवाल नारायण राणे यांना कालच्या अर्थात 6 फेब्रुवारीच्या पत्रकार परिषदेत विचारला गेला होता. नारायण राणे यांनी यावर बोलताना मला त्रास द्यावा एवढी या सरकारची क्षमता नाही. हे माझे काय करू शकतात? परवानग्या नाकारल्या तर कोर्ट आहे ना! कोर्ट बोलल्यावर हे घाबरतात. मला काही अडचण नाही आली. यावेळी चर्चा वगैरे काही झाली नाही. ज्यावेळी जीआर काढायचा होता, त्यावेळी बोललो जीआर काढा कळू दे महाराष्ट्राला कॉलेज आणले आहे. त्यावेळी मुख्यमंत्री बोलले हो काढतो. बाकी काही बोलले नसल्याची प्रतिक्रिया दिली.