रात्री १ पर्यंत सुरू राहणार मुंबईतील बार आणि रेस्टॉरंट


मुंबई : बृह्नमुंबई महानगरपालिकेने मुंबईमधील हॉटेल, रेस्तराँ, मद्यालये, फूड कोर्ट सकाळी ७ ते रात्री १ या वेळेत खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत दुकाने, तर सकाळी १० ते रात्री १०.३० या काळात मद्यविक्रीची दुकाने (वाईन शॉप) सुरू ठेवता येणार आहेत. याबाबतचे परिपत्रक शनिवारी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी जारी केले.

हळूहळू मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागताच टप्प्याटप्प्याने टाळेबंदी शिथिल करण्यास सुरुवात झाली. दुकाने सुरुवातीला अटीसापेक्ष मर्यादित वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर हॉटेल्सही मर्यादित वेळेसाठी खुली करण्यात आली. मर्यादित वेळ आणि ग्राहकांच्या संख्येवर घातलेल्या निर्बंधांमुळे अनेक हॉटेल मालकांनी नाराजीचा सूर आळवायला सुरुवात केली होती. खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ या निर्बंधांमुळे बसत नसल्याचे त्यांचे म्हणणे होते.

राज्य सरकारने एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन २९ जानेवारी २०२१ रोजी दुकाने आणि उपाहारगृहांच्या वेळा निश्चित केल्या. इक्बालसिंह चहल यांनी राज्य सरकारच्या या आदेशांचा आधार घेत बुधवारी परिपत्रक जारी करून मुंबईतील हॉटेल्स, रेस्तरॉ, मद्यालये, फूड कोर्ट सकाळी ७ ते रात्री १ या कालावधीत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर सकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत दुकाने, तर सकाळी १० ते रात्री १०.३० या काळात मद्यविक्रीची दुकाने खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी हॉटेल, रेस्तराँ आदी रात्री ११ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी होती. परिणामी, आता मुंबई हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्याचे चित्र आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप पूर्णत: आटोक्यात न आल्यामुळे हॉटेल, रेस्तराँ, बारमध्ये जाणाऱ्यांना निर्बंध पाळावेच लागणार आहेत. शारीरिक अंतर, मुखपट्टीचा वापर आणि अन्य उपाययोजनांचे पालन अनिवार्य असल्याचे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २०१५ मधील कलम ५१ ते ६० व भारतीय दंडसंहिता, १८६० मधील कलम १८८ आणि लागू असणाऱ्या इतर कायदेशीर तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.