या वयोगटासाठीचे लसीकरण मार्चपासून होणार सुरू


नवी दिल्ली : 50 वर्षाहून अधिक वयोगटातील लोकांसाठी मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून कोरोना लसीकरणाची सुरुवात होऊ शकते, असे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितले. 16 जानेवारी 2021 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात कोरोना लसीकरण अभियान सुरू करण्यात आले. देशातील 50 लाख लोकांना आतापर्यंत लस देण्यात आली आहे.

सध्या सात लसींवर काम सुरू आहे. यातील तीन लशी क्लिनिकल ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. तर दोन लसी ट्रायलच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात, तर दोन लसी प्री-क्लिनिकल टप्प्यात आहेत. कोरोना लसीकरण अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात एक कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यानंतर दोन कोटी फ्रंटलाईन वर्कर्सला लस देण्यात येईल, अशी माहिती हर्षवर्धन यांनी दिली.

2 फेब्रुवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्ससाठी लसीकरणाचे काम सुरू झाले आहे. तर मार्चच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून 50 वर्षांहून अधिक वयोगटातील लोकांना लस देण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते, असे हर्षवर्धन यांनी सांगितले. आरोग्य कर्मचाऱ्यांसह कोरोना योद्ध्यांना कोरोना लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात लस दिली जात आहे. त्यात कोरोनाशी लढा देण्यासाठी प्रत्यक्ष युद्धपातळीवर लढणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यानंतर पुढील टप्प्यांत ज्येष्ठ नागरिक, तसेच सामान्य नागरिकांना लस दिली जाणार आहे.