आधीपासूनच तयार होती 26 जानेवारीच्या लाल किल्ल्यावरील गोंधळाची स्क्रिप्ट


नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचकडून नियुक्त केलेल्या SIT चौकशीतून प्रजासत्ताक दिनी दिल्ली आणि लाल किल्ल्यावर झालेला गोंधळ आणि हिंसाचाराची स्क्रिप्ट आधीपासूनच तयार होती असा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार लाल किल्ला आणि आयटीओवर एकत्रित येण्याच्या सूचनाकाही उपद्रव करण्यासाठी काही खास समूहांना देण्यात आल्या होत्या. गर्दीत सहभागी होऊन उपद्रवाची सुरुवात करणे आणि आंदोलनकर्त्यांना गर्दीचा हिस्सा बनवून हिंसेत सहभागी करणे हा या समूहांचा उद्देश होता, अशी माहिती मिळाली आहे.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार लाल किल्ल्यावर इकबाल सिंह नावाच्या एका दंगेखोराने गर्दी जमा केली. त्या गर्दीला भडकावले आणि लाहोर गेट तोडण्यासाठी सांगितले. उपद्रवी लोकांनी इकबालच्या सांगण्यावरुन लाहोर गेट तोडले. दिल्ली पोलिसांनी इकबाल सिंहवर 50 हजार रुपयांचा इनाम ठेवले आहे.

पोलिसांनी व्हिडिओ तपासल्यानंतर तज्ञांच्या मदतीने छायाचित्रे काढली आणि प्रसिद्ध केली. यापूर्वी गुन्हे शाखेने 12 दंगेखोरांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. दिल्ली पोलिसांनी या हिंसाचाराबद्दल आतापर्यंत 44 एफआयआर नोंदविल्या आहेत, त्यामध्ये सुमारे दीडशे जणांची अटकही करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे पोहोचल्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत दोघांना अटक केली आहे.

दिल्ली पोलिसांचे विशेष तपास पथक सीसीटीव्ही कॅमेरे, व्हायरल व्हिडिओ, मीडिया कॅमेरे, दिल्ली पोलिसांचे कॅमेरे आणि जनतेच्या आवाहनानंतर पोलिसांना मिळालेल्या सुमारे पाच हजार व्हिडिओंची चौकशी करीत आहे. या तपासानंतर पोलिसांनी या दंगेखोरांना ओळखले. आतापर्यंत त्यांनी 8 दंगेखोरांची माहिती देणाऱ्यांना बक्षीस जाहीर केले आहे.

अत्यंत सावकाश हिंसाचार संदर्भात गुन्हे शाखेचा तपास सुरू आहे. एसआयटीने प्रकरण ताब्यात घेतल्यानंतर आतापर्यंत केवळ दोन लोकांना अटक करण्यात आली आहे. हरियाणा आणि पंजाबमध्ये या प्रकरणातील मुख्य आरोपी दीप सिद्धूच्या शोधात पोलिस तळ ठोकून आहेत. पोलिसांना अनेक ठिकाणी छापे टाकूनही यश मिळत नाही. आपले व्हिडिओ दीप सिद्धू सतत सोशल मीडियावर पोस्ट करुन स्पष्टीकरण देत आहे आणि दिल्ली पोलिसांना आव्हान देत आहे. पण, तो प्रत्येकवेळी पोलिसांपेक्षा दोन पाऊल पुढे आहे. यामुळेच पोलिसांनी आता जनतेची मदत मागितली असून दीप सिद्धू याच्यासह चार जणांची माहिती देणाऱ्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.