आता UN Human Rightsने शेतकरी आंदोलनावर ट्विट करत दिला सल्ला


नवी दिल्ली – शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमांना चौफेर तटबंदी करण्यात आली आहे. दिल्लीबाहेर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सरकारने ठिकठिकाणी रस्ते बंद केले असून, आंदोलन परिसरातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आलेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरही कृषी कायद्यांविरोधातील या आंदोलनाचे पडसाद उमटले आहेत. शेतकऱ्यांना अमेरिकन पॉपस्टार रिहाना व पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गसह अनेकांनी पाठिंबा दिल्यानंतर आता UN Human Rightsने देखील शेतकरी आंदोलनाबद्दल ट्विट करत सल्ला दिला आहे.

रिहाना, ग्रेटा आणि मिया खलिफा यांनी ट्विट केल्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाकडे वेधले गेले. भारतात परदेशातील नामवंतांनी केलेल्या ट्विटवरून बरेच रणकंदन सुरू आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्टपणे भूमिका मांडत उत्तरही दिले आहे.


दरम्यान, आंदोलन सुरू असलेल्या परिसरामधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर बॅरिकेट्स आणि खिळे ठोकून रस्ते अडवण्यात आल्याने आंदोलनकांची मूलभूत गरजांसाठी हेळसांड सुरू झाली होती. यावर UN Human Rightsनं ट्विट करत महत्त्वाचा सल्ला दिला आहे. भारतातील अधिकारी व आंदोलकांना आम्ही सांगू इच्छितो की, शेतकरी आंदोलनादरम्यान जास्तीत जास्त संयम पाळावा. शांततापूर्ण मार्गाने ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं अभिव्यक्ती अधिकार सुरक्षित राखले जावेत. या मुद्द्यावर योग्य तोडगा काढणे सर्वांसाठी महत्त्वाचे असल्याचे UN Human Rightsने म्हटले आहे.