ब्राझीलमधील या द्वीपावर आहे स्त्रियांची प्रसूती मना !

brazil
ज्वालामुखीचा वाहता लाव्हा थंड झाल्यानंतर बनलेला हा द्वीपसमूह ब्राझीलच्या उत्तरी सागरी किनाऱ्यापासून साधारण ३५० किलोमीटरच्या अंतरावर आहे. या द्वीपसमूहामध्ये एकूण २१ लहानमोठी द्वीपे असून, यामधील फर्नांडो डे नोरोन्हा हे द्वीप सर्वात मोठे आणि मानवी वस्ती असणारे एकमेव द्वीप आहे. हे द्वीप अतिशय सुंदर असून, याच्या चहू बाजूंना शांत, सुंदर सागर किनारे आहेत. या द्वीपावर तीन हजार लोकांची वस्ती असली, तरी त्यातील स्त्रियांची प्रसूती मात्र या द्वीपावर होऊ दिली जात नाही. यामागचे कारण, येथे असलेल्या वैद्यकीय सुविधांचा अभाव, हे आहे.
brazil1
या द्वीपावर प्रसूतीगृहांची सोय नसल्याने प्रसूतीसाठी महिलांना अनेक मैलांचा प्रवास करून ब्राझीलमधील शहरांमध्ये जावे लागते. मात्र यंदाच्या वर्षी मे महिन्यामध्ये या द्वीपावर प्रथमच एका स्थानिक महिलेची प्रसूती अगदी अनपेक्षितरित्या झाली. पण प्रसूती होणार असल्याची पूर्वकल्पना महिलेला नसल्याने अचानक प्रसूतीची वेळ आली, तेव्हा प्रसूती या ठिकाणीच करण्यावाचून पर्याय नव्हता. प्रसूती अचानक झाल्यामुळे महिलेने कोणत्याच प्रकारची पूर्वतयारी केली नव्हती. त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी मिळून नवजात अर्भकासाठी कपडे आणि इतर आवश्यक वस्तूंची सोय केली असल्याचे वृत्त ‘ओ ग्लोबो’ या ब्राझिलियन वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले आहे.
brazil2
या महिलेची अचानक झालेली प्रसूती हा एकमेव अपवाद वगळता आजच्या काळामध्येही महिलांची प्रसूती, फर्नांडी डे नोरोन्हा या द्वीपावर कायद्याने मनाच आहे. या द्वीपाला जागतिक हेरीटेज साईटचा दर्जा मिळाला असून, अनेकविध दुर्मिळ प्रजातींचे जलचर पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येथे येत असतात. ‘स्पिनर’ जातीच्या डॉल्फिन्सची सर्वाधिक संख्या याच द्वीपाच्या परिसरामध्ये आढळून येते.

Leave a Comment