जसजसे हवामान बदलते, तसे त्याचे परिणाम आरोग्यावरही दिसून येतात. यामध्ये सर्वसामान्यपणे दिसून येणारा आजार म्हणजे फ्ल्यू. यामध्ये सर्दी होऊन नाकातून पाणी येणे, किंवा नाक बंद होणे, सतत शिंका येणे, घसा दुखणे, क्वचित बारीक ताप असणे, खोकला, डोके दुखणे, अशी अनेक प्रकारची लक्षणे दिसून येतात. फ्ल्यूचा हा आजार अतिशय सामान्य असून, दर वर्षी हजारो लोक या आजाराने त्रस्त होतात. इतर कोणत्याही आजाराच्या मानाने फ्ल्यूचा आजार हा सर्वात जास्त आढळणारा आजार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे हा आजार संसर्गजन्य आहे. जर घरामध्ये एखाद्याला फ्ल्यू झाला असेल, तर घरातील इतर परिवारजन याने ग्रासण्याची शक्यता अधिक असते.
फ्ल्यू केव्हाही होऊ शकतो, पण याचे सर्वाधिक प्रमाण पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये, हवामान बदलत असताना जास्त असते. फ्ल्यूचा व्हायरस हवेतून फैलावणारा आहे. जर कोणाला नुकताच फ्ल्यू झाला असेल, तर सुरुवातीच्या दोन तीन दिवसांमध्ये याचा संसर्ग इतरांना होण्याची शक्यता आधिक असते. आठवड्यानंतर मात्र याचा संसर्ग तितका फैलावत नाही. व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर साधारण दोन दिवसांनंतर फ्ल्यूची लक्षणे दिसून येऊ लागतात. क्वचित इतर लक्षणांच्या बरोबर बारीक तापही दिसून येतो. त्याचबरोबर भूक न लागणे, सांधे दुखी, घसा खवखवणे अशी लक्षणेही दिसून येण्याची शक्यात असते. बहुतेकवेळी फ्ल्यू फारसे औषधोपचार न घेताच बरा होतो. औषधोपचारांच्या सोबत व्यवस्थित विश्रांती देखील आवश्यक असते. त्याचबरोबर पाणी पिण्याचे प्रमाण वाढविणे, आणि क जीवनसत्व व झिंक असलेला पूरक आहार घेतल्याने देखील फ्ल्यू बरा होण्यास मदत होते.
फ्ल्यू टाळण्यासाठी आपण काही गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक ठरते. विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत खबरदारीचे उपाय योजणे अधिक गरजेचे असते. फ्ल्यूचा संसर्ग होऊ नये या करिता वारंवार हात स्वच्छ धुवावेत. विशेषतः बाहेरून आल्यानंतर, नाक पुसण्यासाठी रुमालाचा वापर केल्यानंतर किंवा घरातील वस्तू हाताळल्यानंतर हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. ज्या वस्तूंना किंवा ज्या ठिकाणी सतत आपले हात लागत असतात अश्या वस्तू स्वच्छ राहतील याची काळजी घेणे आवश्यक आहे. ( उदाहरणार्थ दरवाज्याची किंवा कपाटांची हँडल्स). घरातील व्यक्तींनी एकमेकांचे रुमाल किंवा टॉवेल वापरणे आवर्जून टाळायला हवे.
फ्ल्यू बरा होण्यासाठी अँटीबायोटीक्स चा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याखेरीज करू नये. ताज्या दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होत असते. त्यामुळे फ्ल्यू झालेला असताना ताज्या, फार आंबट नसलेल्या दह्याचे सेवन अवश्य करावे. तसेच पाणी आणि सूप सारखे इतर द्रव पदार्थ जास्त घ्यावेत.
फ्ल्यू- कारणे आणि उपाय
Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही