इंस्टाग्रामच्या या नव्या फिचरमुळे डिलीट झालेल्या पोस्टही करता येणार रिस्टोर


फेसबुकची मालकी असलेल्या इंस्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपच्या युजर्ससाठी गुड न्यूज असून एक नवीन फिचर कंपनीने नुकतेच लाँच केले आहे. या नव्या फिचरमुळे इंस्टाग्रामवरील डिलिट झालेल्या पोस्ट देखील आता बघता आणि परत मिळवता येणार आहेत.

कंपनीकडून हे नवीन फिचर रोलआउट करण्यास सुरूवात झाली आहे. कंपनीने या फिचरची माहिती एका ब्लॉगपोस्टद्वारे दिली. या फिचरद्वारे 30 दिवसांमधील जुन्या डिलीट झालेल्या पोस्ट री-स्टोअर करता येतील. डिलिट पोस्ट री-स्टोअर करण्याचा पर्याय इंस्टाग्रामच्या सेटिंग्समध्ये मिळेल. हे फिचर फोटो, व्हिडिओ, रील्स आणि IGTV व्हिडिओ सर्वांसाठी काम करेल. विशेष म्हणजे नव्या अपडेटनंतर युजर्स त्यांच्या स्टोरीजही री-स्टोअर करु शकतील. पण स्टोरीज ३० दिवस नव्हे तर केवळ २४ तासांमध्येच री-स्टोअर करता येईल.

इंस्टाग्राम अकाउंटवरुन नवीन अपडेटनंतर डिलिट केलेले फोटो, व्हिडिओ, रील्स आणि IGTV व्हिडिओ टाइमलाइनवरुन कायमस्वरुपी डिलिट होतील. पण, हा डाटा कंपनी ‘रिसेंटली डिलिटेड फोल्डर’मध्ये ठेवेल. तुम्ही येथून ३० दिवसांमध्ये हा डाटा री-स्टोअर करु शकतात. इंस्टाग्रामचे हे फिचर तुम्हालाही वापरायचे असल्यास सर्वप्रथम अ‍ॅप अपडेट करावे लागेल. त्यानंतर अ‍ॅपच्या सेटिंग्समध्ये जाऊन ‘रिसेंटली डिलीटेड’ पर्यायावर टॅप करावे लागेल.