साहेबांनी गाजवला पहिल्या कसोटीचा पहिला दिवस


इंग्लंडच्या संघाने भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर ३ बाद २६३ धावांपर्यंत मजल मारत खेळावर पूर्ण वर्चस्व राखले. सलामीवीर डॉम सिबली-जो रूट जोडीने पहिल्या सत्रात दोन गडी गमावल्यानंतर संपूर्ण दिवस खेळून काढला आणि संघाला भक्कम स्थितीत आणले. रूटने नाबाद शतक (१२८) ठोकले, पण सिबली शेवटच्या सत्रात ८७ धावांवर पायचीत झाला आणि दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. जसप्रीत बुमराहने २ तर अश्विनने १ बळी टिपला.

भारतात जवळपास वर्षभरानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले. शुक्रवारी चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीला सुरूवात झाली. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर रॉरी बर्न्स आणि डॉम सिबली यांनी अत्यंत संथ सुरूवात केली. काही वेळाने अश्विनच्या गोलंदाजीवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न करताना रॉरी बर्न्स झेलबाद झाला. त्याने ६० चेंडूत ३३ धावा केल्या.

त्यानंतर नवखा डॅन लॉरेन्स खातेही उघडू शकला नाही. त्याला बुमराहने पाचव्या चेंडूवर पायचीत केले. पण त्यानंतर पहिले सत्र आणि दुसरे संपूर्ण सत्र सिबली-रूट जोडीने खेळून काढले. रूटने दमदार शतक झळकावले तर सिबलीने आपली लय कायम राखत त्याला साथ दिली. २०० धावांची भागीदारी रूट-सिबलीने केली. परंतु दिवसाचा खेळ संपण्यासाठी काहीच चेंडू शिल्लक असताना सिबली १२ चौकारांसह ८७ धावांवर पायचीत झाला आणि खेळ थांबवण्यात आला. जो रूट १४ चौकार आणि १ षटकारासह १२८ धावांवर खेळत आहे.