मुंबई – मनसेचा ‘टाईमपास टोळी’ असा उल्लेख करणाऱ्या राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अनेक वर्षांनंतरही बाळासाहेबांचे स्मारण न बांधणे म्हणजे टाईमपास असे म्हणत त्यांनी शिवसेना नेते आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, सन्मानीय बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवास ताब्यात घेणे व अनेक वर्षे तिथे स्मारक न करणे याला टाइम पास म्हणतात.
मनसेचा ‘टाईमपास टोळी’ असा उल्लेख करणाऱ्या आदित्य ठाकरेंना संदीप देशपांडेंचे प्रतिउत्तर
सन्मानीय बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवास ताब्यात घेणे व अनेक वर्षे तिथे स्मारक न करण याला टाइम पास म्हणतात
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 5, 2021
दरम्यान, संदीप देशपांडे यांनी यापूर्वी मुंबईतील पत्रकार परिषदेत शिवसेनेवर आरोप करत शिवसेनेचा ‘वीरप्पन गँग’ असा उल्लेख केला होता. ते यात म्हणाले होते की, वीरप्पन गँग कशी खंडणी वसुल करते याचे पुरावे मी दाखवतो. फेरीवाल्यांना पावती देऊन शिवसेनेकडून खंडणी वसूल केली जाते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे त्यावर फोटो आहेत. तसेच यावर सार्वजनिक पथाचा वापर करणाऱ्यांना होणारा उपद्रव कमी करण्यासाठी आणि कचरा निर्मुलनासाठी घेण्यात येणारा कर, असे लिहिण्यात आले आहे.
आदित्य ठाकरे यांनी संदीप देशपांडे यांच्या या आरोपावर मनसे ही टाईमपास टोळी असल्याचे म्हटले होते. तसेच मनसे ही नेमकी संघटना आहे की पक्ष हेच कळत नाही. त्यांचे कार्यकर्तेही त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाहीत मग आपण का द्यावे? असेही त्यांनी म्हटले होते.