इआययूच्या अहवालावरून रोहित पवारांची मोदी सरकारवर टीका


मुंबई लोकशाही निर्देशांकाच्या २०२० च्या सूचीत ५३ व्या क्रमांकावर जगातील सर्वात मोठी आणि बळकट लोकशाही अशी ओळख असलेल्या भारताची घसरण झाली आहे. या यादीत भारताची दोन क्रमांकाने घसरण झाली. नुकतीच २०२० च्या लोकशाही निर्देशांकाची जागतिक क्रमवारी इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटने (इआययू) जाहीर केली. भारताची या क्रमवारीत घसरण लोकशाहीच्या मूल्यांकडे पाठ फिरवणे आणि नागरिकांच्या स्वातंत्र्याविरोधात कारवाईंमुळे झाल्याचे आपल्या ‘डेमोक्रसी इन सिकनेस अँड इन हेल्थ’ या अहवालातून इआययूने म्हटले आहे. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी यावरून टीका केली आहे.


इआययूच्या लोकशाही निर्देशांकात आपल्या देशाची कामगिरी दरवर्षी खालावत असून २०१४ मध्ये असलेले २७ वे स्थान २०२० मध्ये ५३ पर्यंत घसरलंय. हे नागरिकांसाठी घातक आहे. लोकशाही मूल्ये हा भारताचा आत्मा असून लोकशाही मूल्यांपेक्षा सत्ता आणि अहंकार मोठा नाही याचं भान राज्यकर्त्यांनी ठेवायला हवे, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.