अरे जाऊ दे… कावळयाच्या शापने गुरे कधी मरत नसतात; निलेश राणेंना अजित पवारांचा टोला


पुणे – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजपचे नेते नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी केलेल्या टीकेला अजित पवार यांनी उत्तर दिले आहे. निलेश राणे यांनी राजकीय वर्तुळामध्ये सुरु असणाऱ्या चर्चांचा संदर्भ देत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड होणार असल्याचे संकेत देणारे ट्विट गुरुवारी केले होते. अजित पवार यांना पुण्यामधील एका कार्यक्रमामध्ये याचसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये प्रतिक्रिया देत या टीकेला उत्तर दिले.

अजित पवार यांच्यावर निलेश राणे यांनी ट्विटरवरुन निशाणा साधला आहे. अजित पवार यांना कधी मुख्यमंत्री होता आले नाही आणि ते कधी होणार पण नसल्याचा टोला निलेश यांनी गुरुवारी ट्विटरवरुन लगावला होता. त्याचबरोबर कसेतरी अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले होते, पण महाराष्ट्राला आता दोन उपमुख्यमंत्री मिळणार अशी चर्चा असल्याचेही निलेश यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. निलेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर पुन्हा नॉटरिचेबल होण्याची वेळ आल्याचा उल्लेख करत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार नॉटरिचेबल झाले होते हा जुना दाखला देण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे आपल्या ट्विटमध्ये निलेश राणे यांनी राज्यात सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीमधील तिसरा पक्ष असणाऱ्या काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळाले पाहिजे, असेही म्हटले असून उपमुख्यमंत्रीपद हा काँग्रेसचा हक्क असल्याचेही म्हटले होते.

अजित पवार यांना पुण्यामधील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण राज्यस्तरीय पाणी तपासणी प्रयोगशाळेचे भूमिपूजनाच्या क्रार्यक्रमानंतर पत्रकारांनी निलेश राणे यांनी केलेल्या या टीकेसंदर्भात प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना, अजित पवार यांनी, अरे जाऊ दे… कावळयाच्या शापने गुरे कधी मरत नसतात. हे तुला माहिती आहे ना? त्यांचे आणखी नाव घेऊन त्यांना काय महत्व द्याचे?, असे उत्तर देत हा प्रश्न उडवून लावला.

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या बलात्काराच्या आरोपावरून विरोधकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसला घेरण्याचे प्रयत्न विरोधी पक्षांनी केला होता. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असतानाच निलेश राणे यांनी एवढे गुन्हेगार मिळून एका जेलमध्ये नसतील तेवढे एका पक्षात असल्याचा टोला राष्ट्रवादीला लगावला होता. यावर अजित पवारांनी बोलताना निलेश राणेंच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला होता. ते काही बोलतात आणि त्यावर मी बोलायाचे का? पण एक सांगतो त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याचे म्हणत अजित पवार यांनी निलेश राणेंवर निशाणा साधला होता.