ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनाविरोधात घोषणाबाजी


ठाणे – आज ठाणे महानगरपालिकेचा २०२१-२२ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. महापालिकेत यावेळी गोंधळ पहायला मिळाला. शिवसेनेविरोधात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आयुक्तांसमोर शिवसेनेचा उल्लेख ‘चोर कंपनी’ करत घोषणा देण्यात आल्या. गेल्या वर्षी विकास कामे ठरवताना शिवसेनेने डावलल्याचा आरोप भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांकडून यावेळी करण्यात आला.

गेल्या वर्षी ३७८० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प ठाणे महानगरपालिकेत मांडण्यात आला होता. पण यंदा कोरोना संकटामुळे महापालिकेच्या जमा-खर्चाचे गणित बिघडले आहे. २८०० कोटींचा यंदाचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. जवळपास नऊशे कोटींनी अर्थसंकल्प कमी झाला आहे. ठाणे करावर करवाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यंदाचा अर्थसंकल्प वास्तववादी, काटकसरीचा असल्याचं पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी म्हटले आहे.

पुढच्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये ठाणे महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. यंदाच्या वर्षांचा अर्थसंकल्प या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जात होता. पण, गेल्या वर्षी कोरोनामुळे महापालिकेला अपेक्षित उत्पन्न मिळू शकलेले नाही. त्यातच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे महापालिकेच्या खर्चात वाढ झाली आहे. गेल्यावर्षी प्रशासनाने २०२०-२१ या आर्थिक वर्षांचा ३७८० कोटी रकमेचा अर्थसंकल्प सादर केला होता. ४९.३० लाख अखेरच्या शिलकेसह १८४२.११ कोटी महसुली खर्च आणि १९३७.४० कोटी भांडवली खर्चाचा हा अर्थसंकल्प होता.