महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोलेंची निवड


मुंबई – नाना पटोलेंची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाली आहे. गुरुवारी नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. महाराष्ट्र काँग्रेसला नाना पटोलेंच्या रुपाने आक्रमक चेहरा मिळाला असून यापूर्वी प्रदेशाध्यक्ष पद महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे होते.

दरम्यान काल राजीनामा देते वेळी नाना पटोले म्हणाले होते की, मला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. मी त्याचे पालन करुन माझ्या पदाचा राजीनामा विधानसभा उपाध्यक्षांकडे सपूर्द केला आहे. त्याचबरोबर त्यांना त्यावेळी नव्या जबाबदारीबाबत विचारले असता नाना पटोले यांनी मला नव्या जबाबदारीबाबत अजूनपर्यंत काही कळविण्यात आलेले नाही. मला फक्त विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे आदेश हायकमांडकडून आले आहेत, त्याचे मी फक्त पालन केल्याचे पटोले म्हणाले होते.

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे आता नवा विधानसभा अध्यक्ष कोण होणार? याची चर्चा सुरू झाली आहे. पुढचा विधानसभा अध्यक्ष काँग्रसेचाच असणार का? याबाबत विचारले असता याबाबत महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांचे महत्वाचे नेते याबाबत बैठक घेऊन निर्णय घेतील, असे पटोले म्हणाले होते.