1 एप्रिल 2021 पासून भारतामध्ये PayPal बंद करणार Domestic Payment Services


नवी दिल्ली – यंदा 1 एप्रिल पासून भारतामध्ये डोमेस्टिक व्यवहार बंद करत असल्याची माहिती आज PayPal Holdings Inc या ऑनलाईन पेमेंट सर्व्हिसने दिली आहे. आता 1 एप्रिल 2021 पासून भारतामध्ये स्थानिक व्यवहार पे पलच्या (PayPal) माध्यमातून करता येणार नसल्याचे एक पत्रक कंपनीकडून जाहीर करण्यात आले आहे.

पे पलचे कार्यालय अमेरिकेच्या कॅलिफॉर्नियामधील सेन जोसेमध्ये आहे. याबाबत पे पलने दिलेल्या माहितीनुसार डोमेस्टिक व्यवहारांपेक्षा क्रॉस बॉर्डर पेमेंट बिझनेसवर आता त्यांना अधिक लक्ष द्यायचे आहे. म्हणजेच ग्लोबल कस्टमर्सना 1 एप्रिल पासून भारतीय मर्चंट्सना या सेवेचा लाभ वापर करून ऑनलाईन व्यवहार करता येणार आहे.

दरम्यान पे पलचा पर्याय ऑनलाईन पेमेंटसाठी भारतामध्ये ऑनलाईन फिल्म बुकिंग अ‍ॅप बूक माय शो, फूड डिलेव्हरी अ‍ॅप स्विगी,ट्रॅव्हल आणि तिकिटिंग सर्व्हिस मेक माय ट्रीप यावर युजर्सना दिला जात आहे. पण आता तो पर्याय 1 एप्रिलपासून बंद केला जाणार आहे. पण तुम्ही परदेशी व्यवहारांसाठी जर पे पलचा वापर करत असाल तर तुम्हाला भविष्यात पे पल वापरता येणार आहे.

भारतामध्ये बेंगलूरू, चैन्नई आणि हैदराबादमध्ये पे पलची कार्यालये आहेत. आता डिजिटल व्यवहारांमध्ये काम करणारी येथे पे पलची टीम remittances business वर लक्ष केंद्रीत करणार आहे. भारतामध्ये सध्या युपीआय सेवा देण्यामध्ये गूगल, व्हॉट्सअ‍ॅप, अमेझॉन, फेसबूक, वॉलमार्ट यांच्यामध्ये तगडी स्पर्धा सध्या सुरू आहे.