भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केले पतधोरण, रेपोरेट जैसे थे!


नवी दिल्ली – शुक्रवारी भारतीय रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केले असून रेपो रेट रिझर्व्ह बँकेने कायम ठेवल्यामुळे नं व्याजदर जैसे थे राहणार आहेत. रेपो रेट ४ टक्केच ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीने एकमताने घेतला. याची घोषणा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी केली. यावेळी जीडीपी आगामी आर्थिक वर्षात १०.५ टक्के राहिल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. रिव्हर्स रेपो रेटही रिझर्व्ह बँकेने कायम ठेवला आहे.

रेपो रेट कायम ठेवण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीने घेतल्याची माहिती गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी दिली. पूर्वीचा असलेला रेपो रेट ४ टक्केच कायम ठेवण्यााचा निर्णय घेतला आहे. रिव्हर्स रेपो रेटही ३.३५ टक्के ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर एमएसएफ आणि बँक रेटमध्येही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आगामी २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी जीपीडी वाढीचा दर १०.५ टक्के एवढा निर्धारित करण्यात आला आहे. आर्थिक पाहणी अहवालात याचा दर ११ टक्के राहिल, असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

घरांची विक्री हळूहळू वाढू लागली आहे. त्याचबरोबर लोकांची खरेदी शक्तीही पुन्हा पूर्वपदावर येऊ लागली आहे. अलिकडेच जो सर्वसाधारण अर्थसंकल्प मांडण्यात आला, त्यामुळे गुंतवणुकीची परिस्थिती सुधारण्याची आशा आहे. महागाई दर पुढील जानेवारी ते मार्च या काळात ५.२ टक्के एवढा राहिल, अशी माहिती गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी पत्रकार परिषदेत दिली. पतधोरण जाहीर होण्याचा पार्श्वभूमीवर शेअर बाजारातही उत्साह बघायला मिळाला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हींनी मोठी उसळी घेतली. सेन्सेक्सने ५१००० चा आकडा पार केला. तर निफ्टीही १५००० च्या पुढे गेला.