देशात केवळ अर्णब आणि कंगना देशभक्त आणि आपल्या हक्कासाठी लढणारे आंदोलक शेतकरी देशद्रोही आहेत का?


नवी दिल्ली – शुक्रवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चेदरम्यान अर्णब गोस्वामी आणि कंगना राणावतवरुन सरकारवर टीकस्त्र सोडले. राऊत म्हणाले की, अर्णब गोस्वामी आणि कंगनासारख्या लोकांना आपल्या देशात देशप्रेमी म्हटले जाते. महाराष्ट्रातील एका निरपराध व्यक्तीने त्या अर्णब गोस्वामीमुळे आत्महत्या केली. अशा लोकांना देशप्रेमी म्हटले जाते आणि आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवले जाते.

राऊत पुढे म्हणाले की, ऑफिशियल सीक्रेट कोड तोडत बालाकोट स्ट्राइकबद्दल होण्यापुर्वीच ज्याने सांगितले, तो केंद्र सरकाराच्या शरणामध्ये आहे. तुम्ही त्याला सुरक्षा पुरवता. त्याच्याबद्दल विचारल्यावर तुम्ही शांत बसता. राऊत पुढे म्हणाले की, धर्मेंद्र प्रधान काल बोलत होते आणि आमच्यावर टीका करू लागले. पण, देशात अशी परिस्थिती आहे की खर बोलणाऱ्याला देशद्रोही ठरवले जाते. सरकारला जो प्रश्न विचारेल, त्याला देशद्रोही ठरवले जाते.

राऊत पुढे म्हणाले, देशद्रोहाचा खटला संसदेतील आमचे सहकारी संजय सिंह यांच्यावर आहे. राजदीप सरदेसाई नावाजलेले पत्रकार आहेत, त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला आहे. सिंघु बॉर्डरवर रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकार आणि लेखकांवर देशद्रोहाचा खटला दाखल केला जातो. राऊत पुढे म्हणाले की, IPCची सर्व कलमे देशातील कायद्यातून संपवल्यासारखे वाटत आहे. आत फक्त देशद्रोहाची कलमे लावली जाते. देशाच्या पंतप्रधानांचा आम्ही आदर करतो आणि पुढेही करत राहू. त्यांना प्रचंड बहुमत मिळाले आहे, पण बहुमत अहंकाराने नाही, तर सर्वसम्मतीने चालते. लाल किल्यावर 26 जानेवारीला झालेल्या हिंसाचाराबाबत राऊत म्हणाले की, दीप सिद्धू कोण आहे, हे सरकार सांगत नाही. त्याला अद्याप पकडले नाही, पण 200 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना तुरुंगात डांबल्याचा घणाघात राऊत यांनी केला.