ऑनलाइन शिक्षण बंद केल्यास शाळांवर होणार कारवाई


पुणे – राज्यातील शाळा कोरोनाकाळात सुरू नसल्यामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू होते. पण विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बहुतांश शाळांनी बंद केल्यामुळे पालकांनी पुणे पॅरेन्ट्‌स असोसिएशन व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. उपसंचालक कार्यालय, पुणे येथे त्याची सुनावणी बुधवारी शिक्षण झाली. शिक्षण उपसंचालकांनी यावेळी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद केल्यास कारवाई करण्यात येईल, असे सांगितले आहे.

या सुनावणीमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील काही शाळांची नावे होते. पालकांच्या या शाळांसंबंधी तक्रारी आल्याने शिक्षण उपसंचालक कार्यालयात त्यांची सुनावणी घेण्यात आली. महापालिका हद्दीतील गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूल पिंपरी, ऑर्चिड स्कूल निगडी प्राधिकरण, एस. एन. बी. पी. स्कूल रहाटणी, जि. के. गुरुकुल पिंपळे सौदागर या शाळांसंबंधी पालकांच्या तक्राऱ्या होत्या. ऑनलाइन शिक्षण फी न भरल्यामुळे या शाळांनी विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद केले होते. तसेच एस. एन. बी. पी. शाळा विद्यार्थ्यांकडून देणगी स्वरूपात रक्कम स्वीकारत असल्याची तक्रार दाखल झाल्याने त्याबाबत सुनावणी घेण्यात आली. तसेच एस. एन. बी. पी. शाळा रहाटणी या शाळेची सखोल चौकशी करण्याचे तोंडी आदेश शिक्षण उपसंचालक औंदुबर उकिरडे यांनी दिले आहेत.

या सुनावणी दरम्यान शाळांनी ऑनलाइन शिक्षण कोणत्याही विद्यार्थ्यांचे बंद राहणार नाही, अशी ग्वाही दिली. सदर सुनावणी वेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडील तक्रार निवारण अधिकारी विलास पाटील यांनी संबंधित शाळांना ऑनलाइन शिक्षण बंद केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या वेळी मुख्य लिपिक रवींद्र भाट, पुणे पॅरेन्ट्‌स असोसिएशनचे अध्यक्ष जयश्री देशपांडे उपस्थित होते. जर वेळोवेळी शाळा सूचना देऊनही ऐकत नसतील तर शाळांच्या मान्यता काढून घेण्यात येतील, असे शिक्षण उपसंचालकांनी या वेळी सांगितले. सर्व शाळांनी शासनाच्या आदेशाचे अनुकरण करणे गरजेचे आहे. ऑनलाइन धडे शाळांनी विद्यार्थ्यांना दिलेच पाहिजेत. पालकांच्या तक्रारी आमच्यापर्यंत आल्यास आम्ही वरिष्ठांशी चर्चा करून संबंधित शाळेवर कायदेशीर कारवाई करू. यामध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही.