
नाशिक – राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी टीका केली असून महाराष्ट्र सरकार नेमके काय करत असल्याची विचारणा केली आहे. तसेच काहीतरी गडबड असल्याचे म्हणत पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. त्यांनी ही टीका आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतला नोकरी न देण्यासंदर्भात बोलताना केली. राज्यपाल नाशिकमध्ये आदिवासी सांस्कृतिक भवन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. या कार्यक्रमात कविता राऊतदेखील उपस्थित होती.
महाराष्ट्रातील सरकार नक्की काय करत आहे?; राज्यपालांची ठाकरे सरकारवर टीका
आपल्या गावात कविता राऊतला राहायचे असून सेवा करायची आहे. तिला क्रीडामंत्री सुनील केदार यांनी नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते, पण तिला नोकरी अजून मिळालेली नाही. मंत्र्याने सांगूनही नोकरी मिळत नसेल तर काहीतरी गडबड आहे. पण कविताला मी सांगू इच्छितो की, थोडा वेळ लागेल पण नोकरी नक्की मिळेल. कारण सरकारचे येथे असे काही धंदे चालतात, काहीतरी अडचण आणत राहतात, अशी टीका राज्यपालांनी यावेळी केली.
शिक्षक आदिवासी भागात मिळत नसतील तसेच शिक्षकांची भरती होत नसेल तर महाराष्ट्र सरकार काय नक्की काय करत असल्याची विचारणादेखील यावेळी त्यांनी केली. आपण मुख्यमंत्री असताना शिक्षकांसाठी केलेल्या कामाची माहिती देताना राज्य सरकारशी चर्चा करु असे आश्वासन यावेळी राज्यपालांनी दिले. सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखली जाणारी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतला राज्य सरकारने वर्ग १ पदावर नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. पण अद्यापही नोकरी मिळालेली नाही. यासंबंधी कविता राऊतने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेटही घेतली होती.
