वायू प्रदुषणाच्या मुद्द्यावर दिल्ली सरकारने घेतला मोठा निर्णय


नवी दिल्ली – दिल्लीतील सत्ताधारी ‘आम आदमी पक्षा’च्या सरकारने वायू प्रदुषणाच्या मुद्द्यावर मोठा निर्णय घेतला आहे. दिल्ली सरकारमधील प्रत्येक वाहन हे येत्या ६ महिन्यात इलेक्ट्रीक असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. त्याचबरोबर सामान्य नागरिकांनीही इलेक्ट्रीक वाहन वापरावे याचे प्रोत्साहन देण्यासाठीच्या अभियानाची सुरुवात केजरीवालांनी केली आहे.

एकूण १०० चार्जिंग स्टेशन तयार करण्यासाठी दिल्ली सरकारकडून टेंडर काढली जात असल्याचेही केजरीवाल यांनी गुरुवारी जाहीर केले. दिल्लीत आतापर्यंत ६ हजार इलेक्ट्रीक वाहनांची विक्री झाली असून यासाठी खरेदीदारांना सबसिडी देखील देण्यात आली आहे. इलेक्ट्रीक वाहन हे एक जनआंदोलन व्हायला हवे. तरच प्रदुषणातून दिल्लीकरांना मुक्ती मिळू शकते. यासंदर्भात दिल्लीचे सरकार जनजागृती मोहीम हाती घेत असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.

इलेक्ट्रीन वाहन निर्मितीसाठी देशातील मोठमोठ्या कार निर्मात्या कंपन्यांनीही पुढाकार घ्यायला हवा. यासोबतच देशातील युवा जेव्हा आपले पहिले वाहन खरेदी करतो तेव्हा ते इलेक्ट्रीक वाहन खरेदी करायला हवे, असेही केजरीवाल म्हणाले. केजरीवाल यांच्या म्हणण्यानुसार, दुचाकी आणि तीनचाकी इलेक्ट्रीक वाहन खरेदीवर दिल्ली सरकार ३० हजारांपर्यंत तर चारचाकी इलेक्ट्रीक वाहन खरेदी करताना १.५ लाखांची सबसिडी देत आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रीक वाहन खरेदी करताना खरेदीदाराला कोणताही रोड टॅक्स आणि नोंदणी शुल्क भरावे लागत नाही.