अर्थसंकल्पानंतर घरगुती सिलेंडर आणि पेट्रोल-डिझेलचे वाढले भाव


नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सरकारी तेल कंपन्यांनी आज सामान्य जनतेला जोरदार झटका दिला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत तेल कंपन्यांनी वाढ करण्याबरोबरच स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीतही वाढ केली आहे. घरगुती स्वयंपाकाच्या १४.२ किलोच्या सिलेंडरच्या किंमतीत २५ रुपयांनी वाढ झाल्यामुळे या सिलेंडरची मुंबईत किंमत ६९४ रुपयांवरुन ७१९ रुपये झाली आहे.

याबाबत इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, २५ रुपयांनी १४.२ किलोचा सिलेंडर महाग झाला असल्यामुळे या सिलेंडरची मुंबईत किंमत ६९४ रुपयांवरुन ७१९ रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी १५ डिसेंबर रोजी या सिलेंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ झाली होती. तर १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत कंपन्यांनी कपात केली आहे. मुंबईत या सिलेंडरच्या किंमत पाच रुपयांनी कपात होऊन तो १४८२.५० रुपयांचा झाला आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रण मुक्त करण्यात आल्याने आंतरराष्ट्रीय बाजारानुसार दररोज याचे दर बदलत असतात. त्यानुसार, आज डिझेलच्या किंमतीत ३५ ते ३७ पैशांनी वाढ झाली तर पेट्रोलच्या किंमतीत ३५ ते ३४ पैशांनी वाढ झाली. दिल्ली आणि मुंबईत पेट्रोलच्या किंमती आजवरच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचल्या आहेत.