कंगनाने सर्व भारतीय क्रिकेटर्सची केली कुत्र्यासोबत तुलना


राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देणाऱ्या पॉप स्टार रेहानावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत संतापली होती. कंगनाने रेहानाच्या ट्विटला रिप्लाय देताना, ‘तू शांत रहा, आम्ही तुझ्यासारखे मुर्ख नसल्याचे म्हणत सुनावल्यानंतर आता भारतीय क्रिकेटपटूंवर कंगना भडकली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर रेहानाच्या ट्विटनंतर कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या शेतकरी आंदोलनाची चर्चा सुरू झाली असून शेतकरी आंदोलनाला जगभरातून पाठींबा दिला जात आहे. तर अनेक भारतीय सेलिब्रिटींकडून भारताच्या अंतर्गत प्रश्नामध्ये हस्तक्षेप करु नये असे प्रत्युत्तर दिले जात आहे. टीम इंडियाचे क्रिकेटपटूही यामध्ये आघाडीवर आहेत. माजी खेळाडू सचिन तेंडुलकरपासून प्रशिक्षक रवी शास्त्रीपर्यंत अनेकांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली. यावर टीम इंडियाचा हिटमॅन सलामीवीर रोहित शर्मानेही भाष्य केले होते. आपण जेव्हा एकजुटीने उभे असतो, तेव्हा देश कायमच मजबूत राहिला आहे. कठीण प्रसंगात समस्येचा तोडगा काढणे ही पहिली गरज आहे. शेतकऱ्यांची भारताच्या विकासात नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. मला खात्री आहे की, आपण एकजुटीने नक्कीच या प्रश्नावर तोडगा काढू, अशा आशयाचे ट्विट रोहित शर्माने केले होते.

अभिनेत्री कंगना राणावत रोहित शर्माच्या या ट्विटवर रिप्लाय देताना चांगलीच संतापली आणि तिने यावरुन जवळपास सर्वच क्रिकेटपटूंना धारेवर धरले. हे सर्व क्रिकेटपटू धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशा स्वरुपात का बोलत आहेत? त्यांच्याच भल्यासाठी करण्यात आलेल्या कृषी कायद्यांना शेतकरी विरोध का करतील? असा सवाल कंगनाने विचारला आहे. तसेच, हे आंदोलक दहशतवादी आहेत आणि गोंधळ घालत आहेत. असे म्हणा ना की, ते दहशतवादी आहेत, भीती वाटते का ? असे उत्तर कंगनाने रोहितच्या ट्विटवर केले आहे. रोहित शर्मा कंगनाच्या या ट्विटला रिप्लाय देतो का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.