मनसे हा नक्की पक्ष आहे की संघटना, हेच मला कळत नाही; आदित्य ठाकरे


मुंबई – शिवसेनेचा वीरप्पन टोळी असा उल्लेख मनसे नेते संदिप देशपांडे यांनी केला होता. आता शिवसेने नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आता त्याला प्रत्युत्तर दिले आहे. मनसे ही टाईमपास टोळी असल्याचा खोचक टोला अदित्य ठाकरेंनी लगावला. चेंबूरमधील भक्ती पार्क परिसरात मियावाकी बागेची पाहणी केल्यानंतर आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर मनसे हा नक्की पक्ष आहे की, संघटना हेच मला कळत नाही. त्यांचे कार्यकर्तेही त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. मग आपण का द्यायचे?’ असा टोलाही यावेळी आदित्य ठाकरेंनी लगावला.

शिवसेनेचा उल्लेख वीरप्पन टोळी असा मनसे नेते संदिप देशपांडे यांनी केला होता. ते म्हणाले की, वीरप्पन गँग मुंबई महापालिकेत काम करत आहे. महापालिकेची ही वीरप्पन गँग भरमसाठ लूट करत आहे. जेवढे लोकांना वीरप्पनने लुटले नसेल, त्यापेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांनी महानगरपालिकेला लुटले आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत वीरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल, असे म्हणत संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र डागले होते.