शिवेंद्रराजेंच्या जाहीर धमकीला अजित पवारांचे प्रत्युत्तर


मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांना साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी जाहीर धमकी दिली असून माझी वाट लागली तरी चालेल, माझे सर्व संपले तरी चालेल पण मी त्याचे सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नसल्याचे वक्तव्य केले आहे. भाजपमध्ये शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रवेश केल्यानंतर शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचा गड राखण्यासाठी प्रयत्न करत असून त्यातून राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. त्यातच राजकीय वर्तुळात शिवेंद्रराजे यांनी दिलेले हे आव्हान चर्चेचा विषय ठरला आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

राजकारणात कोणी कोणाला धमकी देण्याला काही अर्थ नसतो. कार्यकर्त्यांना कदाचित हे बरे वाटावे, आपल्यासोबत ते राहावेत यासाठी कोणीतरी काहीतरी बोलते, परंतू मला त्याबद्दल काहाही माहिती नाही आणि त्या धमकीला घाबरण्याचे काही कारण नसल्याची प्रतिक्रिया अजित पवारांनी शिवेंद्रराजेंच्या वक्तव्यावर दिली आहे.

माझी वाट लागली तरी चालेल, माझं सर्व संपलं तरी चालेल पण मी त्यांचं सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही. माझ्या मागे कोणी मला त्रास द्यायचा प्रयत्न करत असेल तर मी पण संपेन आणि समोरच्यालाही संपवणार ही आपली भूमिका आहे. आपला काटा जर कोणी काढत असेल तर मग काट्याने काटा काढायचा हीच आपली भूमिका स्पष्ट आहे. याबाबतीत मी पण मागे फिरणाऱ्यातील नाही. जर कोणी आडवेपणा करत असेल तर मी पण स्वभावाने आडवा माणूस आहे. मी कोणाला घाबरत नाही. शेवटी मी उदयनराजेंच्या विरोधात विधानसभा लढवून निवडून आलेला माणूस असल्याचे शिवेंद्रराजेंनी म्हटले आहे.

ज्यावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर पेट्रोल-डिझेलचे दर केंद्र सरकारने वाढवले आहेत, त्याच्याबद्दल काही समर्थन करता येत नाही म्हणून राज्य सरकारबद्दल असे वक्तव्य केले जात आहे. पेट्रोलची दरवाढ कोणाच्या हातात असते हे सर्वांनाच माहिती आहे. उलट देशातील आणि राज्यातील लोकांना केंद्र सरकारच्या अशा दरवाढीमुळे पेट्रोल १०० रुपये झाले तरी आश्चर्य वाटणार नाही. त्यांनी आपले अपयश लपवण्यासाठी कदाचित हे वक्तव्य केले असावे, असा टोला अजित पवारांनी लगावला आहे. सरकारने शरजीलच्या बाबतीत अजिबात बोटचेपी भूमिका घेतली नसल्याचे सांगत अजित पवारांनी फडणवीसांचा आरोप फेटाळला.

तसेच सेलिब्रिटींनी कोणाबाबत काय ट्विट करावे हा त्यांचा वैयक्तित अधिकार आहे. आपले मत व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आम्ही त्याबद्दल टीका करण्याचे काही कारण नाही. पण एवढे मोठे आंदोलन होत असताना अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काहीही देण्यात आले नसल्याचे अजित पवारांनी सांगितले. तसेच अजित पवार पुढे म्हणाले, काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद आणि शिवसेनेकडे विधानसभा अध्यक्षपद जाणार असल्याच्या वृत्तावर अशा बातम्यांमध्ये काही तथ्य नसते. एक वर्षापूर्वी महाविकास आघाडी अस्तित्वात आली. त्यावेळी सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र बसून जे निर्णय घेतले त्यांची अमलजबजावणी सगळे करत आहोत. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर बोलताना हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचे त्यांनी म्हटले.