‘ते’ अकाउंट तात्काळ बंद करा अन्यथा कारवाई करू; केंद्राची ट्विटरला नोटीस


नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या दिल्लीतील ट्रॅक्टर रॅलीनंतर शेतकऱ्यांचा नरसंहार करण्यात आल्याचा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत होता. हा हॅशटॅग अनेकांनी आपल्या अकाउंटवरून वापरला. केंद्र सरकारने खोटा हॅशटॅग चालवण्याच्या या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून ज्या अकाउंटवरून हा हॅशटॅग चालवला गेला त्यावर कारवाई करा, अन्यथा तुमच्यावर कारवाई करू, अशी फायनल नोटीसच केंद्र सरकारने ट्विटरला बजावली आहे.

ट्विटरला ही नोटीस केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाने बजावली आहे. ट्विटरवरून दिल्लीतील शेतकरी आंदोलनानंतर #ModiPlanningFarmerGenocide हा हॅशटॅग वापरण्यात आला होता. प्रत्यक्षात असे काहीही घडलेले नसतानाही हा हॅशटॅग वापरण्यात आला होता. केंद्र सरकारने त्याची गंभीर दखल घेऊन ट्विटरकडे तक्रार केली होती. केंद्र सरकारच्या तक्रारीनंतर ट्विटरनेही 250 ट्विटर अकाउंट ब्लॉक केले होते. पण हे ट्विटर अकाउंट त्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आले.

केंद्र सरकार ट्विटरच्या या निर्णयामुळे भडकले असल्यामुळे ट्विटरला केंद्र सरकारने फायनल नोटीस पाठवली असून त्यात संबंधित हॅशटॅग आणि अकाउंट ब्लॉक करण्याची सूचना केली आहे. ही कारवाई जर केली नाही तर ट्विटरवर कारवाई करण्यात येणार असल्याचे केंद्राने म्हटले आहे.

ट्विटरवरील कंटेस्ट पोस्ट तथ्यात्मकरित्या चुकीच्या होत्या. त्यामागचा हेतू केवळ द्वेष पसरविणे हा होता. समाजात तणाव निर्माण करण्यासाठी ठरवून उघडण्यात आलेली ती मोहीम होती. काहीच आधार या मोहिमेला नसल्याचेही नोटिसीत म्हटले आहे. केंद्र सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी करत ट्विटरने हा हॅशटॅग हटवून अकाउंटवर कारवाई करावी अन्यथा ट्विटरवर कारवाई करू, असे केंद्राने म्हटले आहे. केंद्राने यावेळी ट्विटरला सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाची आठवणही करून दिली आहे. त्यात सर्वोच्च न्यायालयाने ट्विटर न्यायालयासारखे निर्णय घेऊ शकत नसल्याचे म्हटले होते.