अॅमेझॉनच्या सीईओ पदावरुन जेफ बेझोस पायउतार


नवी दिल्ली – अॅमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेझोस हे आपल्या पदावरुन पायउतार झाले असून त्यांची जागा आता कंपनीच्या क्लाऊड कम्युटिंग चिफ असलेल्या अॅन्डी जेसी घेणार आहेत. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीपर्यंत हा बदल करण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

कंपनीचे बोर्ड कार्यकारी अध्यक्ष म्हणून जेफ बेझोस यांची निवड केल्याची घोषणा अॅमेझॉनने केली आहे. जेफ बेझोस यांनी सन 1994 साली अॅमेझॉनची स्थापना केली होती. सुरुवातीला केवळ एक ऑनलाईन बुकस्टोअर असलेल्या अॅमेझॉनचे रुपांतर आज जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनीमध्ये झाले आहे. अॅमेझॉनकडून आज जगातील सर्व प्रकारच्या वस्तू विकल्या जातात.

आपल्या कर्मचाऱ्यांना जेफ बेझोस यांनी एक पत्र लिहून अॅन्डी जेसींकडे कंपनीच्या सीईओपदाची धुरा सोपवत असल्याचे सांगत त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. आपल्या पत्रात ते म्हणाले की, अॅमेझॉन कंपनीचा मला बोर्डचे कार्यकारी अधिकारी आणि अॅन्डी जेसी यांनी सीईओ बनवण्यात आले आहे, मला याचा आनंद होत आहे. या नव्या भूमिकेत काम करताना मी नव्या उत्साहाने आणि उमेदीने काम करेन. अॅन्डी जेसीवर माझा पूर्ण भरवसा आहे.

आपल्या पत्रात जेफ बेझोस यांनी पुढे म्हटले आहे की, जवळपास 27 वर्षापूर्वी हा प्रवास सुरु झाला होता. अॅमेझॉन केवळ एक विचार होता, त्यावेळी त्याचे काहीच नाव नव्हते. मला त्यावेळी विचारण्यात यायचे की इंटरनेट काय आहे? आपण आज 13 लाख प्रतिभावान आणि कामाप्रती निष्ठा बाळगणाऱ्या लोकांना रोजगार देत आहोत. आम्ही कोट्यवधी ग्राहकांना आपली सेवा पुरवतो आहे आणि विस्तृत स्वरुपात जगातील सर्वात यशस्वी कंपनीच्या प्रस्थापित झालो आहोत.