१५ फेब्रुवारीपासून सुरू होणार राज्यातील महाविद्यालये


मुंबई : राज्यातील महाविद्यालये कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आली होती. पण आता तिच महाविद्यालये पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. याबद्दलची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येतील. यंदाच्या वर्षी ७५ टक्के उपस्थितीचे बंधन नसेल, अशी महत्त्वाची माहिती सामंत यांनी दिली.

राज्यातील विद्यार्थ्यांकडून काही दिवसांपासून महाविद्यालये सुरू करण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. काही बैठकादेखील यासंदर्भात पार पडल्यानंतर उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत महाविद्यालये सुरू करत असल्याची घोषणा केली. महाविद्यालये सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली आहे. त्यानुसार महाविद्यालये येत्या १५ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सध्या महाविद्यालये सुरू केली जातील. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पर्याय खुले असतील. महाविद्यालयात ७५ टक्के उपस्थिती बंधनकारक नसेल. पण शासनाने घालून दिलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन महाविद्यालयांना आणि विद्यार्थ्यांना महाविद्यालयांना आणि विद्यार्थ्यांना करावे लागेल, असे सामंत म्हणाले.

राज्य सरकारने महाविद्यालय सुरू करण्यास युजीसीनं घालून दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार परवानगी दिली आहे. जे विद्यार्थी महाविद्यालयात येऊ शकत नाही, त्यांना ऑनलाइन क्लासेसचा पर्याय उपलब्ध असेल, असे उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.