चंद्रकांत पाटलांचे शरजील उस्मानीला पकडण्यासाठी योगी आदित्यनाथांना साकडे


मुंबई: हिंदू समाजाविषयी एल्गार परिषदेत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शरजील उस्मानी याला अटक करण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना साकडे घातले आहे. उत्तर प्रदेशात शरजील उस्मानी हा लपून बसला असून त्याला तातडीने अटक करावी, अशा मागणीचे पत्र चंद्रकांत पाटील यांनी योगी आदित्यनाथ यांना पाठवले आहे.

हिंदू समाजाच्या विरोधात अतिशय प्रक्षोभक वक्तव्य एल्गार परिषदेमध्ये मूळ उत्तर प्रदेशचा नागरिक असलेल्या उस्मानीने केले आहे. महाराष्ट्रातील तमाम हिंदू समाजाच्या भावना त्याच्या या विखारी वक्तव्यामुळे दुखावल्या आहेत. उत्तर प्रदेश येथील आजमगढ जिल्ह्यातील सिधारी या गावातील शरजील उस्मानी हा मूळ नागरिक आहे. महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने हिंदू समाजाच्या विरोधात विखारी वक्तव्य करणाऱ्या उस्मानीच्या विरोधात तात्काळ कारवाई करणे आवश्यक होते. पण महाराष्ट्रातील सरकारने आज पाच दिवस झाले तरी त्याच्याविरोधात कुठलीच कारवाई केली नाही. तसेच यापुढेही त्याच्याविरोधात सरकार कारवाई करेल अशी खात्री सध्या वाटत नसल्यामुळे हिंदू विरोधात वक्तव्य करणाऱ्या उस्मानीच्या विरोधात आपल्या सरकारने तातडीने कठोर कारवाई करावी. जेणेकरुन कुठलीही व्यक्ती भविष्यात कोणताही समाज वा धर्माच्या विरोधात अशाप्रकारचे प्रक्षोभक वक्तव्य करण्याचे धाडस करणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री योगी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

शरजीलवर कारवाई करायला एवढा उशीर का होत आहे? तुम्ही खुर्ची वाचवण्यासाठी आणखी कोणत्या गोष्टींची तडजोड करणार आहात? तुम्ही यावर टिप्पणी कराल, यांच्याकडे सरकार नाही तर झोप लागत नाही. आमचे अतिशय उत्तम कामे चालली आहेत. व्यवस्थित सेवा, आंदोलने सुरु आहेत. तुम्ही आम्हाला शिकवू नका. दरवेळी सरकार नाही म्हणून झोप येत नाही, असे गुळगुळीत वाक्य म्हणू नका. कारवाई करणार की नाही ते सांगा, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

शिवसेनेने गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी ‘जलेबी फाफडा’ डिप्लोमेसी आखली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकाला कल्पकता वापरण्याचा अधिकार आहे. शेवटी मतदार सूज्ञ असल्याचे पाटील म्हणाले.