शरजीलच्या वक्तव्यावर कोळसे पाटलांची सावरासावर


पुणे : पुण्यात आयोजित एल्गार परिषदेत आजचा हिंदू समाज पूर्णपणे सडलेला असून मुस्लिमांना मारण्यासाठी आता काही कारण नको, मुस्लीम आहात हे कारण पुरेसे असल्याचे वक्तव्य विद्यार्थी नेता म्हणून चर्चेत असलेल्या शरजील उस्मानी याने केले आहे. पण त्याच्या या वक्तव्यामुळे सध्या वादंग निर्माण झाले आहे.

एल्गार परिषदेचे आयोजक असणारे निवृत्त न्यायमूर्ती बी. जे. कोळसे पाटील यांनी याच पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया दिली असून मनुवादी असे शरजील उस्मानी याला म्हणायचे होते, त्याने त्याऐवजी हिंदु शब्द प्रयोग वापर केल्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, असे निवृत्त न्यायमूर्ती बी. जे. कोळसे पाटील यांनी सांगितले.

निवृत्त न्यायमूर्ती बी. जे कोळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कोळसे पाटील यांनी याबाबत सांगितले की, मनुवाद, मनुवादाच्या विरोधात एल्गार परिषद ही संघर्ष करीत आली आहे. राजकारणाचे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य हे प्रमुख मुद्दे व्हावेत. धार्मिक, मंदिराबाबतच्या मुद्यावरुन राजकारण करु नये, असे त्याचे म्हणणे आहे. राजकारणात प्रमुख स्थानी सामान्य माणसाच्या गरजेचे प्रश्न यावेत, अशी आमची भूमिका आहे.

आपण शरजील उस्मानी या २३ वर्षाच्या तरुणाचे संपूर्ण भाषण ऐकावे. आजवर आम्ही ब्राम्हण्यवादाविरोधात संघर्ष करीत आलो आहे. उस्मानी याला तामिळनाडुतील ब्राम्हणवादाविरोधातील लढाई माहिती नाही. शब्दाचा वापर करताना तो चुकला. त्याला मनूवादी म्हणायचे होते. त्याचे भाषण सुरु असताना आपल्याला हे लक्षात आले नाही. नाही तर तेव्हाच आपण त्या शब्दावर आक्षेप घेतला असता, असे ते म्हणाले आहेत.